Care Tips Of Teeth:- बाह्य व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिले तर यामध्ये आपल्या डोक्यावरील केसांच्या रचनेपासून तर आपण घालत असलेले कपडे, आपले दात म्हणजेच एकंदरीत शरीराच्या बाह्यरचनेचा प्रभाव हा व्यक्तिमत्त्वावर होत असतो. यामध्ये दात हे सगळ्यात महत्त्वाचे असतात.
परंतु बऱ्याचदा दातांची काळजी व्यवस्थित न घेतल्या गेल्यामुळे किंवा तोंडाशी स्वच्छता व्यवस्थित न केल्यामुळे दातांच्या बाबतीत अनेक गंभीर समस्या निर्माण होतात. त्यासोबतच अनेक जणांना धूम्रपान तसेच तंबाखू, गुटखा खाण्याची सवय असते. या अशा सवयीमुळे दातांवर पिवळे डाग पडतात म्हणजे दात पिवळे होण्याचे समस्या निर्माण होते.
दातांवरचे पिवळे डाग पडले किंवा दातांवर जर पिवळेपणा आला तर व्यक्ती मोकळेपणाने हसायला देखील संकोचतो. तसेच या सोबतच दात दुखण्यापासून तर दातांना कीड लागणे,
हिरड्यांमध्ये वेदना यासारख्या समस्या देखील उद्भवतात.परंतु यातील दातांवरील पिवळे डाग जर हटवायचे असतील तर काही घरगुती आयुर्वेदिक उपचार केले तर दात चमकदार होतात व निरोगी देखील राहतात. याविषयीची माहिती आपण या लेखात घेऊ.
हे उपाय करा त्यामुळे होतील पिवळे दात चमकदार
1- बाभळीच्या फांद्या आणि पाने– बाभळी ही एक शक्तिशाली वनस्पती असून दात पांढरे करण्यासाठी व दातांमधील इतर समस्या दूर करण्यासाठी ती उपयुक्त आहे.
या जडीबुटी मध्ये अँटी मायक्रोबियल गुणधर्म असतात व त्यामुळे बाभळीचे पाणी किंवा फांद्या चावल्या तर त्यामध्ये असलेले अँटिबॅक्टेरियल एजंट मोकळे होतात. याव्यतिरिक्त बाभळीच्या कोवळ्या फांद्यांचा वापर जर तुम्ही टूथब्रश सारखा केला तर त्यामध्ये आढळणाऱ्या टॅनिनमुळे दात चमकदार होतात.
2- आंबा आणि पेरूच्या पानांचा उपयोग– जर आंबाचे पाने व पेरूची पाने दातांवर घासले तरी दात पांढरे होण्याला खूप मोठी मदत मिळते. या दोन्ही झाडांची हिरवी पाने ही इनेमल क्लीनरच्या रूपामध्ये खूप मोठे काम करतात.
यासाठी तुम्हाला लसूण, सेंधव मीठ, पेरू आणि आंब्याची पाने एकत्र करून त्यांना बारीक करून पावडर बनवावी लागेल व ही पावडर दररोज दातांवर घासावी लागेल. यामुळे दात चमकदार होतीलच परंतु हिरड्या देखील मजबूत होतील.
3- वडाच्या फांद्यांचा उपयोग– वडाच्या कोवळ्या फांद्या तुम्ही टूथब्रश सारख्या वापरू शकतात. या फांदीने दात घासल्याने देखील खूप मोठा फायदा मिळतो. यामुळे दात चमकदार तर होतातच परंतु हिरड्यांचे आरोग्य देखील उत्तम राहते.
4- कडुलिंबाचा उपयोग– दात चमकदार करण्यासाठी कडुलिंबाच्या झाडाच्या फांदीचा वापर बरेच व्यक्ती करताना आपल्याला दिसतात. कडू लिंबाच्या तेलाचा विचार केला तर यामध्ये अँटिसेप्टिक गुण असतात. त्यामुळे तोंडाची दुर्गंधी दूर होण्यास मदत होते व किटाणू देखील दूर होतात. दाताना जर कीड लागण्याची समस्या असेल तर ती देखील दूर होण्यास मदत होते.
5- तुळशीचा वापर– तुळशीचा वापर करायचा असेल तर याकरिता तुळशीची काही पाने घ्यावी व ती वाळवून घ्यावी व त्यांची पावडर तयार करावी. या तयार पावडरने बोटांच्या सहाय्याने दात घासावेत. तुळशीच्या पानांमुळे दातांचे चांगली स्वच्छता होते व ते चमकदार देखील होतात. महत्वाचे म्हणजे हिरड्यातून रक्त येण्याची समस्या असेल तर ती देखील मिटते.
अशा पद्धतीने हे साधे आणि सोपे आयुर्वेदिक उपाय केल्याने पिवळे दात चमकदार तर होतातच,परंतु दातांचे आरोग्य देखील उत्तम राहते.