Dengue Disease:- सध्या हिवाळ्याचा कालावधी सुरू असल्यामुळे तापमानामध्ये कमालीची घट होते व या थंडीच्या वातावरणामध्ये अनेक संसर्गजन्य आणि साथीचे आजार पसरण्याचा धोका संभवतो. जर आपण प्रामुख्याने पाहिले तर या कालावधीत सर्दी, खोकला यासारखा त्रास तर होतोच परंतु काही विषाणूजन्य आजार देखील पसरतात.
प्रामुख्याने डासांच्या माध्यमातून पसरणाऱ्या विषाणूजन्य आजारांचे प्रमाण देखील या कालावधीत वाढण्याची शक्यता असते. सध्या आपण अनेक दिवसांपासून ऐकत किंवा वाचत आहोत की महाराष्ट्र मध्येच नाही तर भारतामध्ये डेंग्यू या आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे.
डेंग्यू हा आजार प्रामुख्याने एडिस इजिप्ती या डासाच्या प्रजातीपासून प्रामुख्याने पसरत असतो. जर आपण यासंबंधी माहिती घेतली तर असे कळते की साधारणपणे या प्रजातीच्या डासाने जर चावा घेतला तर चार ते दहा दिवसात शरीरामध्ये डेंग्यूची लक्षणे दिसतात. त्या अनुषंगाने आपण डेंग्यू बद्दलची महत्त्वाची माहिती या लेखात घेणार आहोत.
डेंग्यूची लागण झाल्यानंतर कोणती लक्षणे दिसतात?
एडीस इजिप्ती या डासाच्या प्रजातीने चावा घेतल्यानंतर साधारणपणे चार ते दहा दिवसांमध्ये या आजाराची लक्षणे दिसायला लागतात व यामध्ये प्रामुख्याने जेव्हा पहिली स्टेज असते तेव्हा पेशंटला अचानक थंडी वाजायला लागते आणि तीव्र स्वरूपाचा ताप अंगात भरतो.
या तापासोबतच अंग दुखायला लागते व डोकेदुखी, हाडे व सांध्यांमध्ये देखील वेदना व्हायला लागतात. कमालीचा अशक्तपणा जाणवायला लागतो व मळमळ, अंगावर सूज व पुरळ येण्याची शक्यता असते. नाक व हिरड्यांमधून रक्त यायला लागते. साधारणपणे अशा स्वरूपाची लक्षणे डेंग्यू या आजारात दिसून येतात.
महत्वाचे म्हणजे शरीरातील प्लेटलेट्स या तापामुळे खूप झपाट्याने कमी व्हायला लागतात. डेंग्यूची ही लक्षणे दिसल्यानंतर ताबडतोब उपचारांची गरज असल्यामुळे कोणत्याही प्रकारचे दुर्लक्ष न करता ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
डेंग्यू होऊच नये म्हणून काय कराल?
जर याबाबत आपण आरोग्य तज्ञांचे मत पाहिले तर त्यांच्यानुसार डेंग्यूची दुसऱ्या स्वरूपाची लागण टाळायचे असेल तर त्यावर प्रतिबंधात्मक उपायांवर भर देणे खूप गरजेचे आहे. या डासाच्या प्रजातीच्या ज्या काही अळ्या असतात त्या साचलेल्या खराब पाण्यामध्ये जास्त करून जन्म घेतात.
त्यामुळे घरात किंवा अवतीभवती असे अस्वच्छ पाणी साचू देऊ नये. ज्या ठिकाणी पाणी साचत असेल त्या ठिकाणी कीटकनाशकांची फवारणी करत राहणे गरजेचे आहे. डेंगू च्या डास चावणार नाही यापासून स्वतःचे संरक्षण करणे गरजेचे आहे. असेच शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढेल याकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे.
डेंग्यूवर औषध उपचार आहेत काय?
तसे पाहायला गेले तर या आजारावर ठराविक असे उपचार किंवा औषध उपलब्ध नाही. परंतु जर लवकरात लवकर लक्षणे दिसायला लागली आणि वेळेत उपचार केले तर डेंग्यूवर सहजपणे नियंत्रण मिळवता येते. तसेच पेन किलर्स गोळ्या किंवा औषध आणि ताप कमी होणाऱ्या औषधांचा समावेश केला तर लक्षणे कमी होतात.
काळजी घेऊन देखील दुर्दैवाने डेंग्यूचा प्रादुर्भाव झाला तर अशा रुग्णाने पाणी भरपूर प्रमाणात प्यावे. साधारणपणे या आजारातून बरे व्हायला तीन ते आठ दिवसांचा कालावधी जायला लागतो. विशेष म्हणजे यामुळे शरीराच्या प्लेटलेट्स कमी होत असल्याने ज्या पदार्थांमुळे कमी झालेल्या प्लेटलेट्स वाढतील असे खाद्यपदार्थ आहारात घेणे गरजेचे आहे.