आरोग्य

तुम्हाला विसरण्याची सवय आहे का ? मग ही बातमी फक्त तुमच्यासाठीच…

Published by
Ahmednagarlive24 Office

Health News : दैनंदिन जीवनात आपण अनेक गोष्टी करत असतो, अनेक लोकांची भेट होत असते. कधी कधी असे होते की एखादी परिचित व्यक्ती बऱ्याच दिवसांनी आपल्यासमोर आली तर आपल्याला त्याचा चेहरा तर आठवतो, पण नाव आठवत नाही. किंवा असेही होते की आपण किमती वस्तू आपण कुठेतरी ठेवून विसरून जातो.

खूप तयारी करून परीक्षा देण्यासाठी जाणारे विद्यार्थी ऐन परीक्षेच्या वेळी वाचलेले विसरून जातात. हे असे होणे म्हणजे आपल्याला डिमेन्शिया म्हणजे विस्मृतीचा आजार तर झाला नाही ना, अशी भीती अनेकांना वाटते.

पण संशोधनातून असे स्पष्ट झाले आहे की, छोट्या छोट्या गोष्टी विसरणे हा काही गंभीर आजार नाही. ती मेंदूची एक सामान्य प्रक्रिया आहे.

‘हर्बर्ट वर्थाईम यूएफ स्क्रिप्स इन्स्टिट्यूट फॉर बायोमेडिकल इनोव्हेशन्स अँड टेक्नॉलॉजी’ या विख्यात संस्थेमधील मेंदुविकार तज्ज्ञ (न्यूरॉलॉजिस्ट) प्रोफेसर डॉ. रोनाल्ड डेव्हिस सांगतात की,

दैनंदिन जीवनात छोट्या छोट्या गोष्टी विसरणे ही गंभीर बाब नसून ती मेंदूची सामान्य प्रक्रिया आहे. याचा डिमेन्शियाशी म्हणजे विस्मृतीच्या आजाराशी काहीही संबंध नसतो.

आपण दररोज अनेक गोष्टी पाहतो, वाचतो आणि ऐकतो. यामुळे मेंदूमध्ये माहितीचे भांडार तयार होत असते. अशावेळी त्यातील कोणत्या गोष्टी स्मरणात ठेवणे आवश्यक आहे

आणि कोणत्या गोष्टी स्मरणात ठेवणे तुलनेने गरजेचे नाही, याची वर्गवारी आपला मेंदू करत असतो. त्यामुळे काही छोट्या छोट्या गोष्टी ज्या कमी महत्त्वाच्या असतात, त्यांचा आपल्याला विसर पडतो, असे डॉ. डेव्हिस सांगतात.

Ahmednagarlive24 Office