Health News : एखादा मानसिक आजार जडलेल्या व्यक्तीकडे आपण सारेच विचित्र नजरेने पाहतो. त्याच्यापासून आपल्याला कधीही धोका उत्पन्न होऊ शकतो, अशी नाहक भीती बहुतांश लोकांच्या मनात बसलेली असते.
मात्र, प्रत्येक मनोरुग्ण हा हिंसक असेल, असे नसते. नव्या संशोधनातून असा दावा करण्यात आला आहे की, मनोविकारांची लक्षणे काही प्रमाणात का होईना सर्वांमध्ये आढळून येतात.
डर्बी युनिव्हर्सिटी, इंग्लंडमधील ‘फोरेन्सिक सायकॉलॉजी’ या विषयाचे प्रोफेसर लुईस वॉलेस यांनी याबाबत सखोल संशोधन केले आहे. ते सांगतात की, मानसिक विकारांची सौम्य लक्षणे सर्वांमध्येच आढळतात.
त्याचा बाऊ करणे योग्य नाही. मनोरुग्णाच्या हिंसक लक्षणांकडेच जर लक्ष दिले तर त्यांच्या उपचार करणे कठीण होते. कारण मनोरुग्णांमधील काही लक्षणे ही सकारात्मकही असतात.
त्यांच्या लक्ष दिल्यास रुग्णाची मानसिक स्थिती सुधारता येते. ‘द मास्क ऑफ सॅनिटी’ या जगप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक आणि अमेरिकेतील प्रख्यात मनोविकार तज्ज्ञ हर्वे क्लेक्ले यांनी एका मनोरुग्णावर केलेल्या अध्ययनातूनही अशाच प्रकारचा निष्कर्ष काढला होता.
मनोरुग्णावर आतापर्यंत जे संशोधन झाले आहे ते बहुतांश संशोधन विविध आरोपांखाली तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांवरच झाले आहे. त्यामुळे कादंबऱ्या आणि चित्रपटांमध्ये मनोरुग्ण हा हिंसक असतो, असेच चित्रण करण्यात आले आहे. त्यामुळे मानसिक विकारांबाबत समाजात एक चुकीची भावना तयार झाली आहे.