मोबाईल ही आता अत्यंत गरजेची वस्तू झाली आहे. घरातील अगदी लहान मुलं देखील मोबाईल मागतात. सध्या या लहान मुलांना जेवताना मोबाईल देण्याची एक पद्धत रूढ होताना दिसतेय. लहान मुलांनी दूध पिण्यास आणि जेवण करायला नकार देताच त्याच्या हातात मोबाइल दिला जातो व मुलगाही खायला तयार.
परंतु अशी बालके ६ महिन्यांमध्येच चिडचिडे होतात. ते सातत्याने मोबाइल मागतात व रडत राहतात. मोबाइल न दिल्यास आई-वडिलांना मारण्याचा प्रयत्न हे मुले करतात. ही बाब अनेक लहान मुलांमध्ये आहे. सध्या काही बालरुग्णालयात काही बालके पाहावयास मिळत आहेत. त्यामुळे वेळीच सावध होऊन मुलांना या व्यसनापासून दूर ठेवले पाहिजे.
हळू हळू सोडवा सवय
मुलांना टीव्ही आणि मोबाइल दाखवून खाऊ घालू नका. जेवणासाठी मुलांना १५ ते ३० मिनिटे द्या , एकत्र बसून जेवण करा. सुरुवातीला मुलगा रागावेल, पण हळूहळू त्याची सवय बदलेल
काय होतायेत परिणाम ?
जेवण पाहिल्यानंतर मेंदूमध्ये लहरी निर्माण होतात. न्युरॉन्समुळे तोंड, पोट आणि आतड्यांमध्ये पाचक रस, लाळ बाहेर पडते. त्यामुळे जेवण चांगले पचते. मोबाइल फोनकडे बघत खाल्ल्याने जेवणावर लक्ष केंद्रित राहत नाही. मुले जेवणावर समाधानी होत नाहीत. मूल फक्त खात राहते, त्यामुळे वजन वाढते.
एका संशोधनानुसार, मोबाइल फोन पाहत जेवणाऱ्यांना मुलांना आपल्याला किती भूक लागली आहे हे लक्षात येत नाही. तो कमी अधिक खात राहतो. त्याने काय खाल्ले हेही त्याला आठवत नाही. ते जेवण कमी चावतात असे सांगितले आहे.
त्यामुळे स्क्रिन टाईम जितका वाढेल तितका धोका जास्त वाढेल. मुलगा जे काम करत आहे ते पूर्ण लक्ष देऊन करत आहे का यावर लक्ष ठेवा. फक्त जेवणच नाही तर दैनंदिन दिनचर्येसाठीही हा नियम लागू करा असा सल्ला बालरोगतज्ज्ञ देतात.