Conjunctivitis in Marathi : डोळे येण्याची साथ हळूहळू पसरू लागल्याने रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. लहान मुलांपासून वयोवृद्ध व्यक्तींचे डोळे येण्याची (कंजक्टिवाईटीस) म्हणजेच डोळ्यांचा आजार होऊ लागला आहे.
लहान मुलांनादेखील डोळे येत असल्याने या संसर्गजन्य आजाराचे रुग्ण परिसरातील रुग्णालयांत दिसून येत आहे. डोळे आल्याने डोळ्यांचा रंग लाल-गुलाबी होत आहे. डोळ्यांची जळजळ, खाज सुटते, डोळ्यांना सुज येणे, सकाळी डोळ्यांच्या पापण्या एकमेकांना चिकटणे, डोळ्यांतून सारखे पाणी येणे आदी लक्षणे दिसत आहेत.
हा आजार संसर्गजन्य असल्याने कुटुंबातील अनेकांना त्रास होत आहे. वातावरणातील बदलामुळे डोळ्यांचा संसर्ग वाढत असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
त्याचप्रमाणे सातत्याने होत असलेल्या या वातावरणातील हवामान बदलामुळे सर्दी, खोकला व तापाच्या रुग्णांमध्येदेखील झपाट्याने वाढ होत असल्याचे पाहावयास मिळत आहे.
बहुतांश घरांमध्ये डोळे येणे या आजाराचे रुग्ण आढळत आहेत. विशेष म्हणजे सर्दी, खोकला, ताप, पोटदुखी, पेशी वाढणे -कमी होणे, उलट्या, जुलाब तसेच डोळे येणे आजाराने त्रस्त झालेले रूग्णदेखील असल्याचे दवाखान्यांमध्ये दिसत आहेत.
अशी लक्षणे असलेले रुग्ण वाढत असल्याने यामध्ये लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांचा जास्त समावेश आहे. अचानक आलेल्या या साथीच्या आजाराने जोर धरल्याने नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
सध्या वातावरण बदलामुळे डोळ्यांची साथ असल्याने रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे इतर व्यक्तींचा रुमाल, टॉवेल, कपड्याने डोळे पुसू नयेत, हात स्वच्छ पाण्याने सतत धुवा, डोळ्यांना सतत स्पर्श करू नये, संसर्ग झाल्याचे लक्षात येताच स्वतःहून काही उपचार न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार सुरू करावेत.