Health News : कॅनबेरा हॉस्पिटलमधील न्यूरोसर्जन डॉ हरी प्रिया बंदीचा यांनी न्यू साऊथ वेल्समधील ६४ वर्षीय महिलेवर शस्त्रक्रिया करून एक सुमारे तीन इंच लांबीचा जंत बाहेर काढला. हा जंत त्या महिलेच्या डोक्यापर्यंत कसा पोहोचला या विचाराने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
या महिलेला सुरुवातीला ओटीपोटात दुखणे, जुलाब आणि ताप यासारखे त्रास सुरू झाले. स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या या रुग्णाला होणारा त्रास वाढला. त्यामुळे तिला अखेरीस कॅनबेरा रुग्णालयात उपचारासाठी नेले, जिथे तिच्या मेंदूच्या एमआरआय स्कॅननंतर, मेंदूची शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता जाणवली.
महिलेची शस्त्रक्रिया सुरू असताना न्यूरोसर्जन डॉ. हरी प्रिया बंदीचा यांना मेंदूमध्ये एक वळवळणारा जिवंत जंत सापडला. सर्जिकल पथकाला ३ इंच लांबीचा, चमकदार लाल असा जंत सापडला ज्याला शास्त्रज्ञ ओफिडास्कॅरिस रॉबर्टसी असे म्हणतात. हा जंत हा सामान्यतः सापांमध्ये आढळतो.
सापांमध्ये आढळणारा जंत महिलेच्या शरीरात कसा पोहोचला याचे डॉक्टरांना कोडे पडले आहे. त्यांचा सापांशी थेट संबंध नव्हता, पण त्यांच्या घराजवळील तलावावर अनेक साप आहेत.
महिलेने खाल्लेल्या पालकासारख्या खाद्यपदार्थावर जंतांची अंडी आली असण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. ही महिला तिच्या घराच्या परिसरात पालक पिकवत असे, त्यामुळे त्यावर अळीची अंडी आली असावी, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या प्रकरणामुळे प्राण्यांमध्ये आढळणारे आजार आता माणसांमध्येही संक्रमित होत आहेत हे दिसून येते. मात्र या महिलेचा हा आजार एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरत नाही.
कीटक आणि सापांचे जगभरात वास्तव्य असल्याने येत्या काळात जगातील इतर देशांतही असेच प्रकार पाहायला मिळतील. दुसरीकडे या महिलेची प्रकृती आता ठीक आहे, परंतु अद्यापही तिच्यात काही लक्षणे आहेत.