Marathi News : किडनीचे आजार असणाऱ्या सर्वसामान्य रुग्णांना डायलिसिसचा खर्च न परवडण्यासारखा असतो. त्यामुळे सध्या अनेक संस्था डायलिसिस सुविधा कमी खर्चात उपलब्ध करून देतात,
मात्र आता राज्य शासनाच्या सेंट जॉर्ज रुग्णालयात अशा गरजू रुग्णांसाठी किडनी डायलिसिसची मोफत सेवा उपलब्ध होणार आहे. मेंटेनन्स हिमो डायलिसिसचे उद्घाटन वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती जे.जे. रुग्णालय समूहाच्या अधिष्ठात्या डॉ. पल्लवी सापळे यांनी दिली.
सध्या किडनीच्या आजारात वाढ झाल्याने रुग्णांना डायलिसिस मोठ्या प्रमाणावर लागते. त्यामुळे काही रकमेची सवलत देऊन काही संस्था डायलिसिस सुविधा पुरवतात. मात्र ही रक्कम देखील भरणे काही रुग्णांना शक्य नसते.
त्यामुळे अशा रुग्णांसाठी डायलिसिस सुविधा पुरवण्यासाठी आरोग्य विभागाचे मंत्री, अधिकारी आणि डॉक्टर प्रयत्न करत होते. सध्या सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना उपचारांदरम्यान डायलिसिसची गरज असल्यास त्यांचे डायलिसिस करण्यात येत होते.
त्यामुळे याच रुग्णालयात बाहेरून येणाऱ्या रुग्णांवर देखील डायलिसिस करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. जे.जे., नायर, सायन आणि केईएम रुग्णालयात अॅक्युट डायलिसिस केले जाते. पण रुग्णांचे योग्य व्यवस्थापन कोणत्याही रुग्णालयात केले जात नाही,
ज्या रुग्णांना आठवड्यातून किमान दोन वेळेस डायलिसिस लागते असे रुग्ण खासगी रुग्णालयातून डायलिसिस करून घेतात. योग्य पद्धतीने आणि वेळच्या वेळी डायलिसिस उपलब्ध झाले तर रुग्णाची आयुमर्यादा वाढते. पण त्याचा खर्चही जास्त आहे.
सामान्य वर्गासाठी महिन्याला २० ते २५ हजारांचा डायलिसिससाठीचा खर्च हा परवडणारा नसतो. त्यामुळे अशा प्रकारे मोफत सेवा सुरू करणारे सेंट जॉर्ज हे सरकारी रुग्णालयांतील पाहिले रुग्णालय ठरणार आहे.
१५ मशिन्स रुग्णालयाला उपलब्ध झाल्या आहेत. त्यापैकी एक एचआयव्ही, एक एचबीसीजी आणि १० सामान्य रुग्णांसाठी मशिन्स असणार आहेत. जर कोविड वाढला तर ३ बेड्स आणि ३ डायलिसिस मशीन कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवल्या जाणार आहेत.
एका मशीनवर किमान चार तासांचा कालावधी
एका वेळच्या डायलिसिससाठी बाहेर जवळपास ७०० ते ८०० रुपये खर्च येतो. हा खर्च कमी करून रुग्णांवरील खर्चाचा भार कमी व्हावा यासाठी महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत ही सेवा दिली जाईल.डायलिसिसची गरज असणारा कोणताही रुग्ण इथे येऊन डायलिसिस करून घेऊ शकेल आणि घरीदेखील जाऊ शकेल.
एका मशीनवर डायलिसिससाठी किमान चार तासांचा कालावधी लागतो. अशा १५ मशीनवर दिवसाला जवळपास ४५ रुग्णांचे डायलिसिस केले जाईल. रुग्णांचा भार वाढल्यास आणखी काही मशीन आणि बेड्सची सोय केली जाईल,
असे जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठात्या डॉ. पल्लवी सापळे यांनी सांगितले. या डायलिसिस सुविधेसाठी खास समितीची स्थापना करण्यात येणार आहे. जेणेकरून प्रत्येक रुग्णाला प्राधान्य दिले जाईल. शिवाय ही तटस्थ समिती असल्याकारणाने रुग्णाची योग्य नोंद ठेवण्यास आणि लक्ष देण्यास मदत होईल, असे सेंट जॉर्ज रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. विनायक सावर्डेकर यांनी सांगितले.