Monsoon Tips : पावसाळ्यात फक्त त्वचा, डोळे किंवा सांधेच नाही तर जठरासंबंधी समस्यादेखील उद्भवतात. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अत्यंत काळजी घेणे आणि जठरासंबंधी समस्या दूर ठेवणे आवश्यक आहे. पावसाळ्याच्या दिवसात आतड्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी काही गोष्टींचे पालन करणे गरजेचे आहे.
उच्च आर्द्रता, दूषित पाणी आणि अन्न या गॅस्ट्रिक समस्यांना कारणीभूत ठरणाऱ्या घटकांमुळे एखाद्या व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. पावसाळ्यातील दमट हवामानामुळे पचनक्रिया मंदावते आणि पोट फुगणे, जठरासंबंधी समस्या जाणवणे, आम्लपित्त आणि अपचनाचा त्रास होऊ शकतो.
उघड्यावरचे अन्न खाल्ल्याने अनेकांना उलट्या, जुलाब, पोटदुखी अशा समस्या होतात. शिळे किंवा खराब झालेले अन्न खाल्ल्याने अन्नातून विषबाधा होऊ शकते. साल्मोनेला आणि ई कोलाईसारख्या जीवाणूंनी संक्रमित असे कच्चे आणि कमी शिजवलेले अन्न खाल्ल्याने अन्न विषबाधा होते.
अशा टाळा गॅस्ट्रिक समस्या
प्रोबायोटिक्सचा आहारात समावेश करा आतड्यांच्या आरोग्यासाठी प्रोबायोटिक्स उपयुक्त ठरतात. दही, ताक यांचा आहारात समावेश करा.
पुरेसे पाणी प्या
पचनास मदत करण्यासाठी आणि शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी पाण्याची आवश्यकता असतो. दररोज किमान १० ते १२ ग्लास पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. मात्र हे लक्षात ठेवा की शरीर ओव्हरहायड्रेट करू नका, कारण तेदेखील आरोग्य समस्यांना आमंत्रण देऊ शकते.
कच्च्या भाज्या खाऊ नका
वाफवलेल्या किंवा उकडलेल्या भाज्या खाणे पचनासाठी योग्य ठरते. कच्च्या भाज्यांमध्ये बॅक्टेरिया आणि विषाणू असू शकतात, ज्यामुळे आतड्यांचे आरोग्य बिघडून पोटाचा संसर्ग होण्याची शक्यता असते.
न शिजवलेले सीफूड खाणे टाळा
पावसाळ्यात पाणी दूषित असल्याने, सुशी, साशिमीसारखे कच्चे सीफूड खाल्ल्याने अतिसाराची समस्या उद्भवू शकते. एवढेच नाही तर जंकफूड, प्रक्रिया केलेले पदार्थ आणि हवाबंद डब्यातील अन्नाचे सेवन करणे टाळा.
शर्करायुक्त पदार्थांचे सेवन टाळा
आईस्क्रीम, चॉकलेट, कैंडी, मिठाईचे सेवन कमी करा, त्यामुळे शरीरात जळजळ होऊ शकते आणि आतड्याला त्रास होऊ शकतो.