Health News : व्हर्टिगो हा एक शारीरिक संतुलन संबंधित आजार आहे, जो सामान्यतः आतील कानाच्या समस्यांमुळे होतो. या त्रासामुळे अचानक असह्य संवेदना होतात, ज्यामुळे एखाद्या व्यक्तीला चक्कर आल्यासारखे वाटते.
ही समस्या जास्त करून महिलांमध्ये दिसून येत आहे; परंतु महिलांमध्ये या समस्येबाबत जागरूकतेचा अभाव असल्याने याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे व्हर्टिंगो या आजाराबद्दल महिलांमध्ये जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे.
चक्कर येणे, बधिरपणा येणे, गरगरणे आणि तोल जाणे अशा लक्षणांमुळे एखाद्याच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होऊ शकतो. यामुळे अनेकदा पडणे, होणे आणि शारीरिक आरक्षण्या वरही गंभीर परिणाम होतात. स्त्रियांना, विशेषतः हार्मोनल चढ-उतार आणि इतर कारणांमुळे चक्कर येण्याचा अधिक धोका असतो.
पुण्यातील अपोलो स्पेक्ट्रा रुग्णालयातील ईएनटी स्पेशालिट डॉ. सुश्रुत देशमुख म्हणाले की, व्हर्टिगो ही एक अशी स्थिती आहे, जिथे तुम्हाला तुमच्या आजूबाजूचे परिसर गोल फिरत असल्याचे जाणवते आणि विशेष म्हणजे जेव्हा तुम्ही अजिबात हालचाल करत नसता तेव्हादेखील असा अनुभव येतो.
व्हर्टिगोची लक्षणे आणि उपलब्ध उपचारांबाबत जागरूकता नसणे, ही एक चिंताजनक बाब ठरत आहे. अनेक व्यक्ती त्यांच्या लक्षणांना तात्पुरती अस्वस्थता समजून त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे आवश्यक वैद्यकीय मदतीला उशीर होतो.
शिवाय, एक आश्चर्यकारक बाब डॉ. देशमुख सांगतात की, ही समस्या पुरुषांपेक्षा जास्त महिलांमध्ये दिसून येते. हे काही प्रमाणात हार्मोनल बदलांमुळे आढळून येते, जे आपल्या शरीराच्या संतुलनावर कानाच्या आतील भागावर परिणाम करू शकते. गर्भधारणा, रजोनिवृत्ती आणि गर्भनिरोधकांचा वापरही यास कारणीभूत ठरू शकतात.
प्रत्येक व्यक्तीने, विशेषतः महिलांनी त्यांच्या शरीराकडे लक्ष दिले पहिजे. जर तुम्हाला चक्कर येणे, तोल जाणे, अस्वस्थता जाणवत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करु नका. व्हर्टिगोबाबत पुरेशी जागरूकता पसरवणे, पीडित व्यक्तींना त्यांच्या जीवनावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि त्यांना आवश्यक असलेला आधार मिळवून देण्यास नक्कीच मदत करेल.
आजाराची तीव्रता कमी करण्यासाठी वेळेवर औषधे घेणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करणे आवश्यक आहे. यामुळे व्हर्टिगो नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते आणि ते लवकरच बरे होऊ शकतील.