Mango Ripening : उन्हाळा सुरू झाला की बाजारात आंब्याची आवक वाढू लागते. उन्हाळ्याच्या हंगामात आंब्यांनी बाजारपेठा सजतात. आंब्याला फळांचा राजा म्हणून ओळखला जातो. आंबा खाणे अनेकांना आवडते. हे असे फळ आहे जे पाहताच क्षणी तोंडाला पाणी येते. मात्र, आंबा पिकवताना अलीकडे केमिकलचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याचे उघडकीस आले आहे. आंबाच नव्हे तर सर्वच प्रकारची फळे जलद पिकवण्यासाठी केमिकलचा वापर होतो आणि हे मानवी आरोग्यासाठी खूपच घातक आहे.
केमिकलच्या वापरामुळे एका दिवसातच कैरीचे रूपांतर पिवळ्या धमक आंब्यात होते. याचा परिणाम म्हणून मात्र मानवाचे आरोग्य धोक्यात आले आहे. आंबा पिकवण्यासाठी ज्या रसायनांचा वापर केला जातो त्यामुळे कॅन्सर होण्याची भीती असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे. आंबा पिकवण्यासाठी आधीपासूनच विविध रसायनांचा वापर होतोय, अशातच आता चायना पुडी देखील आंबा पिकवण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरले जात असल्याचे सांगितले जात आहे.
म्हणजेच नागरिकांच्या जीवाशी सर्रासपणे खेळ चालवला जात आहे. राज्यातील वाशी मार्केटला मोठ्या प्रमाणात आंब्याची आवक होते. या मार्केटमध्ये आंबे पिकवण्यासाठी रायपिंग चेंबर उपलब्ध आहेत. पण, आवक वाढली की हे चेंबर अपुरे पडतात ही वास्तविकता आहे. वाशी मार्केट मधून स्थानिक बाजारात आंबे विक्रीसाठी दाखल होतात. हा आंबा कच्चा स्वरूपात असतो म्हणजे कैरी असते.
आता ही कैरी तर आंबे म्हणून बाजारात विकता येऊ शकत नाही. यामुळे मग व्यापारी जादूची कांडी वापरतात. या जादूच्या कांडीमुळे एका रात्रीतूनच कैरीचे रूपांतर आंब्यात होते. ही जादूची कांडी म्हणजे रसायन. आता या रसायनांमुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतात हे त्यांना चांगलेच ठाऊक असतं. मात्र पैशांच्या हव्यासापायी नागरिकांच्या आरोग्याशी खेळ चालवला जात आहे.
मानवी आरोग्यावर हानिकारक परिणाम होत असलेल्या रसायनांचा वापर आंबे पिकवण्यासाठी होतोय. आधी आंबे पिकवण्यासाठी कार्बाईडचा वापर होत असे. मात्र यावर बंदी आली आहे. व्यापाऱ्यांना रायपिंग चेंबरचा वापर करून नैसर्गिक पद्धतीने आंबे पिकवण्याचे निर्देश दिलेले आहेत. परंतु या आदेशाला केराची टोपली दाखवली जाते आणि कमी कालावधीत आंबा कसा पिकवला जाईल याकडे व्यापारी वर्गाचे अधिक लक्ष असते.
यासाठी मोठ्या प्रमाणात रसायनांचा वापर होतो. यामध्ये कॅल्शियम कार्बाइड याचा देखील समावेश होतो. त्याच्या वापराने मोठ्या प्रमाणात उष्णता तयार होते आणि लवकर आंबे पिकतात. याबाबत अन्न व प्रशासन विभागाकडून संबंधितावर कारवाई केली जाते. परंतु ही कारवाई पुरेशी नसल्याने अजूनही केमिकलचा सर्रास वापर होतोय ही वास्तविकता आहे. दरम्यान अलीकडे बाजारात काही रसायनांची पावडर असलेली चायनापुडी आंबे पिकवण्यासाठी वापरली जात आहे.
रासायनिक औषधांचा वापर करून पिकवलेल्या आंब्याचे दुष्परिणाम
जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, जर रासायनिक औषधांचा वापर करून पिकवले गेलेले आंबे सेवन केलेत तर याचे मानवी आरोग्यावर मोठे दुष्परिणाम होतात. यामुळे तोंडाला फोड येणे, त्वचेवर दाग पडणे, पचनासंबंधी तक्रारी, अतिसार, डोळ्याला अंधारी, मळमळ, छातीत जळजळ असे दुष्परिणाम पाहायला मिळतात. एवढेच नाही तर याच्या सेवनाने कॅन्सर होण्याचा सुद्धा धोका असतो.
यामुळे नागरिकांनी आंबे खरेदी करताना विशेष सावध राहिले पाहिजे असे आवाहन तज्ञांनी केलेले आहे. दुसरीकडे व्यापाऱ्यांनी रसायनांचा वापर टाळला पाहिजे, नैसर्गिक पद्धतीने आंबे पिकवूनच बाजारात त्याची विक्री केली पाहिजे असे देखील आवाहन तज्ञांकडून करण्यात आले आहे. नागरिकांनी जे लोक रसायनांचा वापर करून फळे पिकवतात त्यांच्यावर कठोर कारवाई शासनाने आणि प्रशासनाने करायला हवी असे मत यावेळी व्यक्त केले आहे.