Health News : क्रॉनिक मायग्रेन व्यक्तीच्या आयुष्यावर मोठा परिणाम करत असूनही, हा आजार अद्याप गांभीर्याने घेतला जात नाही आणि त्यामुळे बऱ्याच रुग्णांमध्ये त्याचे निदानच होऊ शकत नाही. क्रॉमिक मायग्रेनचे (सीएम) वर्गीकरण प्राथमिक डोकेदुखीचा आजार म्हणून केले जाते.
३ महिन्यांच्या काळात रुग्णाला महिन्यातील पंधरा किंवा त्याहून अधिक दिवस डोकेदुखीचा त्रास होत असेल आणि यातील किमान आठ वेळा मायग्रेनची वैशिष्ट्ये जाणवत असतील, तर तो क्रॉनिक मायग्रेन समजला जातो. जगभरातील अनेक जण या आजाराने ग्रस्त असतात. त्यामुळे दखल घेण्याजोगा त्रास होतो.
मायग्रेन हा आजार सहसा प्रौढांनाच होतो, असे समजले जाते पण लहान मुलांनाही या अवस्थेचा अनुभव येतो, हे लक्षात घेणे फार आवश्यक आहे. अधूनमधून होणाऱ्या मायग्रेनच्या त्रासातूनच पुढे क्रॉनिक मायग्रेन होतो.
मायग्रेनच्या त्रासाची वारंवारता वाढते आणि/किंवा मायग्रेन क्रॉनिक होत जाण्याशी निगडित अनेक धोक्याची लक्षणेही दिसू लागतात. क्रॉनिक मायग्रेनचे प्रचलन मध्यमवयात वाढते. त्यामुळे व्यक्तीच्या सर्वांत उत्पादनक्षम वर्षांवर परिणाम होतो.
क्रॉनिक मायग्रेन पुरुषांच्या तुलनेत ( ०.६ ०.७ टक्के) स्त्रियांना (१.७-४.० टक्के) अधिक होतो. स्त्रियांमध्ये या आजाराचे प्रचलन अधिक आहे. यामुळे क्रॉनिक मायग्रेन समजून घेण्यासाठी व त्यावर उपचार करण्यासाठी सर्वसमावेशक दृष्टिकोन ठेवण्याची आवश्यकता प्रकर्षाने भासते.
यामध्ये अनेक शाखांचा समावेश होतो आणि जीवशास्त्रीय तसेच मानसिक- सामाजिक घटकही विचारात घ्यावे लागतात. यावर कन्सल्टिंग न्युरोलॉजिस्ट डॉ. राजशेखर रेड्डी यांनी सांगितले, क्रॉनिक मायग्रेन्स हा मज्जासंस्थेचा जटील विकार असून, अनेकविध घटक त्याला कारणीभूत असतात.
क्रॉनिक मायग्रेनचे लक्षणीय परिणाम सर्वांना माहीत आहेत आणि अनेक अभ्यासांद्वारे या विकारातून उद्भवणाऱ्या बाबींचा तपास करण्यात आला आहे.
डोकेदुखीमुळे येणारी विकलांगता, आयुष्यातील आरोग्याचा खालावलेला दर्जा, त्याचवेळी निर्माण होणाऱ्या आणखी वैद्यकीय व मानसिक आरोग्यविषयक समस्या तसेच अधिकाधिक आरोग्यसेवा संसाधनांचा वापर आदी समस्यांचा यात समावेश होतो.