यंदा प्रचंड उष्णता आहे. उन्हाचा पारा ४० अंशापर्यंत गेला आहे. त्यामुळे सध्या कलिंगड, लस्सी, उसाचा रस आदी पदार्थांकडे लोक वळले आहेत. परंतु लोकांची ही गरज त्यांच्या आरोग्याची शत्रू तर बनत नाही ना असा सवाल पडला आहे.
याचे कारण असे की मार्केटमध्ये काही लोक भेसळ करत आहेत. रसात दूषित पाण्याच्या बर्फ, फालुद्यामध्येही बनावट खावा, कलिंगड पिकवण्यासाठी रसायनाचा वापर आदी गोष्टी वाढल्याने आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
एक व्हिडीओ सध्या मीडियावर व्हायरल होत आहे. यातील व्यक्तीने बाजारपेठेतून खरेदी केलेली दोन कलिंगडे फ्रिजमध्ये ठेवली. कलिंगडाच्या सालीवर रंग दिल्याचे आढळले.
कलिंगड थंड झाल्यानंतर रंगाचे पापुद्रे निघून कलिंगडाच्या सालीचा खरा नैसर्गिक रंग दिसू लागला. कलिंगड कापल्यानंतरही ते नैसर्गिक लाल रंगापेक्षा अधिक गडद होते. कलिंगड पिकवण्यासाठी रसायनाचा वापर करून त्याची विक्री होत असल्याचे समोर आले.
दरम्यान, फ्रिजमध्ये कलिंगडाच्या थंड गराला टिश्यू पेपर लावल्यास तो लाल होतो. कलिंगडाच्या गराची फोड पाण्यात टाकल्यास पाण्याचा रंग लाल होतो. सालीचा खरा नैसर्गिक रंग दिसू लागतो. अपरिपक्व कलिंगड तोडून त्यावर रंग दिला जातो. गर लाल होण्यासाठी रसायनांचा वापर केला जात असल्याचे समोर आले आहे.
उन्हाळ्यात आणखी एक लोकप्रिय पदार्थ म्हणजे उसाचा रस. मात्र, बरेचदा या रसात वापरला जाणारा बर्फ दूषित पाण्यापासून तयार केलेला असतो. त्यामुळे कावीळ, पोटदुखीसारखे आजार होण्याचा धोका वाढला आहे.
रस्त्यावर विक्री केल्या जाणाऱ्या फालुदा आइस्क्रीममध्ये बनावट दुधापासून तयार केलेला खवा, लस्सीचा वापर होत असल्यानेही आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. आइस्क्रीममध्ये बनावट दुधापासून तयार केलेला खवा, लस्सीचा वापर होत असल्याचे काही लोक बोलत आहेत.