सध्या जिल्ह्यासह ग्रामीण भागात विविध आजारांनी थैमान घातले आहे. डेंग्यू, चिकुनगुनिया आदी आजारांनी बहुतांश लोक त्रस्त आहेत. पावसाळा लागला की हे आजार प्रकर्षाने वाढतात. सध्या बहुसंख्य दवाखाने याच रुग्णांनी फुल्ल झाले आहेत.
काही ठिकाणी थंडी, ताप, मलेरिया, गोचीड ताप आदी आजारांचे देखील रुग्ण वाढलेले दिसतायेत. या काही आजारांत प्रतिकार क्षमता कमी होत जाते तसेच डेंग्यू किंवा चिकुन गुनिया आजारात प्लेटलेट कमी होतात. अशावेळी बहुतांश लोकांना किवी किंवा ड्रॅगनफ्रूट खाण्याचा सल्ला दिला जातो.
पण मित्रांनो पावसाळ्यात फक्त ही फळे खाल्ल्यानेच रोगप्रतिकारक शक्ती वाढते, असे नाही तर इतर आपल्या मातीत पिकणाऱ्या पालेभाज्या आणि खाल्ल्यानेही चांगली रोगप्रतिकारक शक्ती वाढत असल्याचे आहार तज्ज्ञांनी सांगितले.
ड्रॅगन फ्रूटची आवक
पावसाळ्यात ड्रॅगन फ्रूटचा हंगाम असतो, त्यामुळे रस्त्यांवरील विक्रेत्यांकडे लाल रंगाची ही फळे मोठ्या प्रमाणात दिसतात. सध्या शहरात अनेक भागात ही फळे विक्रेत्यांकडे दिसतायेत. साधारण १०० रुपयांपर्यंत ही फळे विकली जात आहेत.
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त
पावसाळ्यात डेंग्यू आजाराचे प्रमाण जास्त असते. डेंग्यू आल्यावर शरीरातील प्लेटलेट कमी होतात. ड्रॅगन फ्रूट, पपई, किवी फळाचे सेवन केल्यावर प्लेटलेट वाढत असतात , असे सांगितले जाते त्यामुळे अनेकजण हे फळ खातात.
इतर फळांचेही मागणी वाढली
सध्या बाजारात पपईलाही चांगली मागणी आहे, चांगल्या दराची पपई ४० ते ५० रुपये किलोप्रमाणे घ्यावी लागत आहे. पांढऱ्या पेशी कमी झाल्यानंतर डॉक्टर पपई खाण्याचा सल्ला देतात.