शरीर बळकट व पिळदार असावे असे अनेकांना वाटते. यासाठी अनेक तरुण आपापल्या पद्धतीने प्रयत्नशील असतात. तालमीत जाऊन व्यायाम करून व योग्य आहाराद्वारे शरीर बळकट करण्यासाठी प्रयत्न केले जातात. परंतु अलीकडील काळात तरुणांमध्ये ‘सिक्स पॅक’साठी स्टेरॉईड घेण्याचे प्रमाणही वाढले आहे.
परंतु या स्टेरॉईड मुळे तरुणांच्या हृदयावर आणि मूत्रपिंडावर विपरीत परिणाम होऊन शरीरावर अनावश्यक चरबी वाढण्याचा धोका वाढतो आहे. यातून पूर्णतः आरोग्य कोलमडण्याची शक्यता आहे. शहरांसह ग्रामीण भागातही जीमचे फॅड वाढले आहे. जीममध्ये जाणाऱ्या तरुणांमध्ये पहिले काही दिवस उत्साह असतो.
मात्र झटपट बॉडी करण्यासाठी शॉर्टकट म्हणून सप्लिमेंट घेण्यासाठी तरुण उत्साही असतात. याचबरोबर स्टेरॉईडचे इंजेक्शनही घेतात. याचा विपरीत परिणाम त्यांच्या शरीरावर होत आहे.
रक्तवाहिन्या ठिसूळ देखील होतात ठिसूळ
स्टेरॉईडचा जास्तीचा वापर केल्यास थेट परिणाम हार्मोन्सवर होतो. यामुळे रक्तवाहिन्या ठिसूळ होतात. यातून हाडे झिजण्याचे प्रमाण वाढते. रक्तातील साखर वाढण्यास सुरुवात होते. यामुळे शरीरातील ताकद घटते. अवयव नाजूक होतात.
स्टेरॉईड, फूड सप्लिमेंट शरीराला उपयोगी की घातक?
आकर्षक शरीरयष्टी घडविण्यासाठी वापरण्यात येणारे हे प्रकार आरोग्याला धोकादायक आहेत. यातून हृदय विकाराचा झटका येण्याची शक्यता असते. यातून मसल अशक्त होतात. रक्तवाहिन्या कमकुवत होतात. याचा परिणाम हृदयावर आणि मूत्रपिंडावर होतो असे तज्ञ म्हणतात.
शरीर असे ठेवा फिट
पिळदार शरीरयष्टी बनविण्यासाठी नक्कीच प्रयत्न केला पाहिजे परंतु त्यासाठी गैर मार्गाचा वापर योग्य ठरणार नाही. उत्तम आणि पोषक आहार घेणे तसेच योगा आणि सूर्यनमस्कारसह अनेक प्रकारचे व्यायाम केल्याने शरीराला मोठ्या प्रमाणात फायदा होत असतो. आहारात फळे, कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या घेतल्यास व सोबतीला चालण्याचा किंवा सायकल चालवण्याचाही व्यायाम ठेवला तरी शरीर फिट राहते.