Ahmednagar News : श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर गावात फवारणी झाली नसल्याने मलेरिया व डेंग्यूची रुग्णसंख्या वाढत आहे. एका मुलीच्या उपचारासाठी संतप्त पित्याला साठ हजारांचे बिल भरण्याचा आर्थिक फटका सहन न झाल्याने बेलापूर ग्रामपंचायत आवारातील काउंटरवर पेट्रोल टाकून हातातील कागद पेटविण्याचा प्रयत्न केला मात्र, स्थानिक पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन प्रतिबंध केल्याने पुढील अनर्थ टळला.
बेलापूर गाव व वाड्या वस्त्यावर अनेक महिन्यांपासून फवारणी झाली नाही. परिणामी, गावात मलेरिया आणि डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे त्यांना उपचार घेण्यासाठी मोठी रक्कम खर्च करावी लागत आहे.
सर्वसामान्य कुटुंबाच्या आवाक्याबाहेरील रक्कम खर्च होत असल्याने नागरिक वैतागले आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे गावातील नागरिक संतोष खोसे यांची मुलगी मलेरिया व डेंग्यूने आजारी पडली. तिच्यावर उपचार करण्यासाठी त्यांना तब्बल साठ हजार रुपये खर्च करावे लागले.
ग्रामपचायतींच्या हलगर्जीणामुळे गावात फवारणी झाली नाही. त्याचा मोठा आर्थिक फटका बसल्याने संतप्त झालेल्या संतोष खोसे गुरूवारी पेट्रोलसोबत घेवून ग्रामपंचायत कार्यालयात आले मात्र कार्यालय बंद झालेले असल्याने त्यांनी आवारातील काऊंटरवर सोबत आणलेले पेट्रोल टाकून हातातील कागद पेटविण्याचा प्रयत्न केला.
स्थानिक पोलिसांना याची कुणकुण लागल्याने त्यांनी तात्काळ जाऊन प्रतिबंध करुन त्यांना ताब्यात घेऊन समज दिल्याने मोठा अनर्थ टळला.
या प्रकारामुळे ग्रामपंचायत प्रशासन खडबडून जागे झाले असून तात्काळ फवारणी करण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. दरम्यान, स्थानिक पोलीस औट पोस्टचे सहाय्यक फौजदार सुधीर हापसे यांच्याशी संपर्क साधला असता,
संतप्त नागरिक संतोष खोसे यांनी पंचायतीच्या आवारात हातातील कागद पेटविण्याचा प्रयत्न केल्याच्या कारणावरून ताब्यात घेऊन समज देऊन सोडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.