उष्णतेचा कडाका वाढत चाललेला आहे. अहमदनगरसह अनेक जिल्ह्यात पारा ३८ अंशावर गेला आहे. त्यामुळे उष्णतेपासून अनेक अपाय अनेकांना होत आहे. आपण उन्हाळ्यात स्वतःची काळजी व्यवस्थित घेतली तर या अनेक त्रासापासून आपण स्वतःला फिट ठेऊ शकतो.
उन्हाळ्याच्या दिवसात सहसा अनेकांना उन्हाळी लागणे, घोळणा फुटणे असे प्रकार होतात. अशावेळी काहीजण घरगुती, आयुर्वेदिक उपाय करतात. परंतु काहीवेळा फरक पडत नाही. तेव्हा घाबरून न जाता डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेतले पाहिजेत.
उन्हाळी लागणे म्हणजे काय ?
कामानिमित्त अनेकांना घराबाहेर जावे लागते. जर ऊन लागले तर उन्हाळी लागण्याचा त्रास होतो. काहींना घरात राहूनदेखील उन्हाळीचा त्रास होऊ शकतो. उन्हाळी लागणे म्हणजे लघवी करताना दाह जाणवतो, मूत्रमार्गात इन्फेक्शन झाल्यानेदेखील जळजळ होते. उन्हाळी तीव्र असली तर लघवीच्या जागी तीव्र वेदना होतात.
अचानक अशी परिस्थिती उद्भवली काय करायचे असा प्रश्न अनेकांना पडतो. हा त्रास होऊ नये यासाठी भरपूर पाणी पिले पाहिजे. हलके, फिकट रंगाचे, सैल आणि सच्छिद सुती कपडे घाला. उन्हात जाताना गॉगल, छत्री/टोपी, शूज किंवा चप्पल वापरा. उन्हात जड काम टाळा, मद्य, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड शीतपेये टाळले पाहिजेत.
घोळाना फुटणे
उन्हाळ्यात अनेकांना नाकातून रक्त येण्याचा त्रास जाणवतो. यालाच घोळाना फुटणे असेही म्हणतात. काही लोकांना थोडावेळ उन्हात गेल्यावर, नाक टोकरल्यावर किंवा नाकाला कशाचा धक्का लागला तर नाकातून रक्त येते. काही वेळा रक्तप्रवाह थांबत नाही.
नाकाला रक्तपुरवठा करणारी एखादी रक्तवाहिनी जर तुटली तर त्यातून रक्तस्राव होतो. नाकातून रक्तस्त्राव होत असेल तर नाक चिमटीमध्ये दाबून धरावे. नाकाला बर्फाने शेकावे.
घोळाणा फुटण्याची कारणे ?
नाकामध्ये कोरडेपणा असणे, नाकाला चोळणे, ब्लडप्रेशरमुळे नाकातून रक्तस्राव होऊ शकतो. तीव्र ऊन लागल्यामुळे रक्तस्राव होऊ शकतो.
तज्ज्ञ म्हणतात…
उन्हाळ्यात भरपूर पाणी प्यावे. तहान लागली नसली तरीही पुरेसे पाणी प्यावे असा सल्ला तज्ज्ञ देतात. घरातून बाहेर पडताना फिकट रंगाचे आणि सुती कपडे तसेच गॉगल, छत्री, टोपी आदी घातले पाहिजे. तसेच खूप त्रास जाणवला तर डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.