लंडन : चीनमध्ये हाहाकार माजविणाऱ्या कोरोना विषाणूचा उद्रेक आपल्या देशाच्या सार्वजनिक आरोग्यासाठी गंभीर आणि घातक धोका असल्याची घोषणा सोमवारी ब्रिटनने केली.
यासोबतच आजपासून कोरोनाच्या संशयित रुग्णांना सक्तीने ताब्यात घेऊन इतरांपासून विभक्त ठेवले जाईल, असेही ब्रिटनच्या आरोग्य विभागाने जाहीर केले. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी दोन रुग्णालयांची निवड करण्यात आली आहे.
अलीकडच्या काळात चीनमधून आलेल्या प्रत्येक व्यक्तीची तपासणी करण्यात येणार आहे. कोरोना विषाणूची लागण झाली असल्याची शक्यता असलेल्या प्रत्येक व्यक्तीने ताब्यात घेतले जाईल आणि त्याच्या चाचण्या करण्यात येतील.
संबंधिताला कोरोनाची लागण झालेली नाही, याची खात्री होईपर्यंत त्याला सक्तीने रुग्णालयात ठेवण्यात येईल. या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी ही पावले उचलण्यात येत असल्याचे आरोग्य विभागाकडून एक पत्रक काढून स्पष्ट करण्यात आले.
गेल्या महिन्यात सिंगापूरमध्ये गेलेल्या एका ब्रिटिश व्यक्तीला कोरोना विषाणूची लागण झाली असून, त्याच्यावर उपचार सुरू आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या इतर सात जणांनाही या प्राणघातक विषाणूचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये ९ वर्षांच्या एका बालकाचाही समावेश आहे.