अहमदनगर Live24 टीम, 01ऑक्टोबर 2021 :-  पावसाळ्यात शहरातील सर्वच रस्ते खड्डेमय बनले असताना, सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शहरात खड्डयांमुळे अनेक लहान-मोठे अपघात होत आहे.

रस्त्यावर करण्यात आलेली पॅचिंग देखील काही दिवसात वाहून गेल्याचे चित्र आहे. महापालिकेच्या नावाने सर्वच नागरिक बोटे मोडत असताना सामाजिक कार्यकर्ते संदीप अशोक भांबरकर यांनी थेट महापालिका विरोधात जिल्हा न्यायालयात खाजगी दावा दाखल केला आहे. न्यायालयाने हा दावा दाखल करुन घेत याची सुनावणी गुरुवार दि.7 ऑक्टोबर रोजी होणार आहे.

शहरातील खड्डयांमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली असून, सोशल मिडीयाच्या माध्यमातून अनेक खराब रस्त्यांचे फोटो, व्हिडिओ व्हायरल करुन निषेध नोंदवत आहे. समाजातील अपप्रवृत्ती व होणार्‍या अन्यायाविरोधात आवाज उठवण्याचा अधिकार असल्याने रस्त्यावरील खड्डे प्रश्‍नी न्यायालयात दाद मागितली असल्याचे भांबरकर यांनी स्पष्ट केले आहे.

महापालिका कर रुपाने जनतेकडून पैसे गो़ळा करते. त्या मोबदल्यात नागरिकांना नागरी सुविधा देण्यास असमर्थ ठरत आहे. कचरा उचलणे, त्याची योग्य विल्हेवाट लावणे, रस्ते व्यवस्थित ठेऊन त्याची निगा राखणे व इतर मुलभूत नागरी सुविधा पुरवण्याचे काम होताना दिसत नाही.

शहरातील अनेक रस्तेच खड्डे व धुळीने माखले आहेत. याला पुर्णत: जबाबदार महापालिकेचे प्रशासकीय अधिकारी आहेत. ठेकेदाराच्या कामाची गुणवत्ता तपासणे व काम योग्य झाले असल्यास त्या ठेकेदाराचे बील काढण्याचे काम महापालिकेचे प्रशासकीय अधिकारी यांनी केले पाहिजे. मात्र महापालिकेत अशा सर्व कामाबाबत अनागोंदी असल्याचा आरोप भांबरकर यांनी केला आहे.

शहरातील रस्ते निकृष्ट व खड्डेमय होण्यास जबाबदार असणार्‍या महापालिकेतील प्रशासकीय अधिकारी यांनी कर्तव्यात कसूर केल्याने त्यांच्यावर कारवाई व्हावी, शहरातील खड्डेमय रस्ते चांगल्या दर्जाचे मजबुत, खड्डे व धुळमुक्त करण्यात येण्याची मागणीसाठी भांबरकर यांनी न्यायालयात दावा दाखल केला आहे. या संदर्भात भांबरकर यांच्या बाजूने न्यायालयात बाजू मांडण्यासाठी अ‍ॅड. शिवाजी सांगळे काम पाहत आहे.