अहमदनगर Live24 टीम, 25  डिसेंबर 2021 :- आज या जगाचा निरोप घ्यावा लागत आहे…माझ्या कुटुंबावर मोठा अन्याय झाला आहे…आमची जमीन बळकावली आहे…

वैतागून मला आत्महत्येला प्रवृत्त केले आहे…मी कुठेतरी लटकलेली बातमी येईल…एकांतात जाऊन निरोप घेतो!’ या आशयाची पोस्ट सोशल मिडियाच्या फेसबुक अन् व्हाट्सअपवर सकाळी ६ वाजता त्याने शेअर केली व मोबाईल बंद केला.(Social media)

अतुल पोपट सुपेकर (रा.कुळधरण ता.कर्जत) असे या तरुण शेतकऱ्याचे नाव. काही क्षणातच या पोस्टने संपूर्ण तालुक्यातच नव्हे तर फेसबुकवर असलेल्या हजारो मित्र परीवारामध्ये खळबळ उडाली.

पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी विपरीत घटना घडू नये म्हणुन या पोस्टचे गांभीर्य लक्षात घेत त्यास प्रतिउत्तर तर दिलेच पण तात्काळ पोलीस पथक ही रवाना केले.

पोलीस, नागरिक, मित्र कुटुंबीयांकडुन त्या युवकाची शोधाशोध सुरू झाली. मोबाईल लोकेशन काढण्याचा प्रयत्न सुरू झाला. शेत, झाडे, विहिरी, तलाव हे सर्वत्र शोधण्यात आले.

वेळ जात होता तशी प्रत्येकाची चिंता-काळजी वाढतच होती. करायचे तरी काय? सर्वांची डोकी बंद पडली होती, अतुल सुपेकरने केलेल्या खळबळजनक आत्महत्येच्या फेसबुक पोस्टवर पो.नि यादव यांनी ‘आपण अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावत आलो आहोत.

त्यांना न्याय मिळवून देत आहोत. याबाबत चर्चा करू हा प्रश्न मी मार्गी लावतो, तु असा अविचार मनात आणू नकोस’ अशी कमेंट केली. यादव यांच्या या पोस्टचे समर्थन करत अनेकांनी लाईक केले.

आणि काही वेळात चक्क अतुलने ही पोलीस निरीक्षक यादव यांना संपर्क साधुन सुखरूप असल्याचे कळवले. ‘कुठे आहेस? मी तुला न्यायला येतो’ असे विचारून पत्ता विचारून घेतला.

श्रीगोंदा येथील मढेवडगाव या गावी कॅनलच्या चारीला एकांतात असलेल्या ठिकाणावर तात्काळ श्रीगोंदा येथील पोलीस पाठवून अतुल यास ताब्यात घेण्यात आले आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.