अहमदनगर Live24 टीम, 02 मे 2022 Ahmednagar News : दारूबंदी, कुऱ्हाडबंदी आणि चराईबंदी या त्रिसुत्रीचा अवलंब करून आदर्श गाव बनलेल्या हिवरेबाजारने आता आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे.

गावाने जोपासलेल्या वनसंपत्तीचा ऱ्हास होऊ नये, यासाठी माती, वाळू आणि आणि गौण खनिजाच्या वाहतुकीसंबंधी गावाने धोरण आखले आहे.

अशी वाहतूक करण्यासाठी गावात अवजड डंपर आणण्यास बंदी करण्यात आली असून ही कामे केवळ ट्रॅक्टरद्वारे करता येणार आहेत.

याशिवाय पुढील गरज लक्षात घेता गावात सौरऊर्जाला प्राधान्य देण्याचे धोरणही आखण्यात आले. महाराष्ट्र दिनी गावात विशेश ग्रामसभा झाली.

त्यावेळी राज्याच्या आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीने विविध निर्णय घेतले आहेत.

प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन आणि तहसीलदार उमेश पाटील, सरपंच विमल ठाणगे, हरिभाऊ ठणगे, एस.टी.पादिर, रामभाऊ चत्तर, रो.ना. पादिर व ग्रामस्थ संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थित होते. ग्रामसभेत जमीन सपाटीकरण करणे, गौणखनिज उत्खनन व वाहतूक करणे यासाठी नवीन नियमावली तयार करण्यात आली. त्याची सविस्तर माहिती देण्यात आली.

या नियमावली अस्तित्वात आल्यावर ग्रामस्थांना आपआपल्या शेतीची सुधारणा करणे त्यात प्रामुख्याने शेतीसाठी आवश्यक काळी माती व इतर गौणखनिज वाहतुकीचे दृष्टीने सोयीस्कर होईल.

त्यानुसार वाहतूक व सपाटीकरण करताना केवळ ट्रॅकटरचाच वापर करण्यात येणार आहे. अवजड वाहतुकीमुळे रस्ते खराब होतात म्हणून डंपरचा वापर करण्यात येणार नाही.

वाहतूक करताना यापूर्वी करण्यात आलेल्या जलसंधारण, मृदसंधारण आणि वनसंवर्धन कामास नुकसान होणार नाही अथवा याची दक्षता घेण्यात यावी.

नवीन घराचे बांधकामासाठी किंवा रस्ते डांबरीकरण करणे कामासाठी आश्यकतेनुसार डंपर वापरता येतील. शेतक-यांनी परवानगी साठी अर्ज केल्यावर ग्रामपंचायतीने ७ दिवसांच्या आत परवानगी न दिल्यास परवानगी आहे असे समजून काम सुरू करण्यास काही हरकत नाही असे समजण्यात येईल, अशी ही नियमावली आहे.