मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (amruta fadnavis) पुन्हा एकदा ट्विटमुळे (Tweet) चर्चेत आल्या आहेत. एका कार्यक्रमात त्यांना याबाबत विचारले असता त्यांनी ट्रोलर्सला (trolls) चांगलेच सुनावले आहे.

अमृता फडणवीस यांनी यापूर्वी काही ट्विट्स डिलीट केले होते. त्यावरून एका ट्रोलर्सने त्यांना प्रश्न केला. त्यामुळे अमृता फडणवीस यांनी रोखठोक विधान केले आहे.

त्या म्हणाल्या, “मी जे काही ट्वीट डिलीट केले असतील, ते देवेंद्र फडणवीसांच्या म्हणण्यावरून केले. नाहीतर मी कुणाच्या बापाला घाबरत नाही”, अशा शब्दात त्यांनी ट्रोलर्सला सुनावले आहे.

तसेच अमृता फडणवीस यांनी ट्रोलर्सला सुनावताना त्यांचे आभारही मानले आहेत. आणि ठाकरे सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. “त्रिशंकू सरकारच्या ट्रोलर्सला नक्की धन्यवाद देईन की त्यांच्या ट्रोलिंगमुळे माझ्या स्त्रीशक्तीचा जागर झाला. मी असेच स्वत:चे विचार व्यक्त करत राहीन आणि तुम्ही असेच ट्रोल करत राहा अशी विनंती करेन”, असे त्यांनी म्हटले आहे.

पूर्ण प्रकरण काय?

एका कार्यक्रमात अमृता फडणवीस यांनी ट्रोलर्सला उत्तर दिले आहे. या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. यावेळी फडणवीस यांनी ट्रोलिंगवर पहिल्यांदाच भाष्य केले आहे.

तसेच ट्रोलिंगमुळे आपल्याला कधी कधी दु:ख होत असल्याचंही सांगितलं. मला ट्रोल केलं जातं तेव्हा मला कधी कधी दु:ख होतं. अमृता यांना मात्र ट्रोलिंगने काही फरक पडत नाहीत. त्या घाबरत नाहीत. फार झालं आता हे मलाच त्यांना कधी कधी सांगावं लागतं. त्यांची सगळी मतं मला पटत नाही.

त्यांनी राजकीय ट्विट करू नये अशी माझी अपेक्षा असते. पण शेवटी त्यांची मतं ही त्यांची आहेत. त्यासाठी तिला कधीतरी ट्रोलिंग सहन करावं लागतं. माहितीतील लोकही ट्रोल करतात तेव्हा मला दु:ख होतं.

शिवसेना (Shivsena), राष्ट्रवादीचे (Ncp) कार्यकर्ते ट्रोलिंग करत असतात. ती मंडळी घाणेरडे चेहरे लावून ट्वीट करतात. तेव्हा वाटतं आपण कुठे चाललो आहोत?, अशी सल देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखवली होती. त्यावर बोलताना अमृता फडणवीस यांनी ट्रोलर्सला झापलं होतं.