file photo

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑक्टोबर 2021 :-  राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी कमी होऊ लागला आहे. यामुळे राज्य सरकारने देखील निर्बंधांमधील कठोरता काहीशी शिथिल केली आहे.

यातच आगामी सणोत्सवचा काळ पाहता होणारी गर्दी लक्षात घेता कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. यामुळे पुन्हा एकदा शासनाने काही नियमावली तयार केली आहे.

ब्रेक द चेन अंतर्गत राज्य सरकारने नवा आदेश जारी केला असून राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, खासगी कार्यालये व औद्योगिक आस्थापनांमध्ये मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे.

कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण तातडीने पूर्ण करण्याबाबतही या आदेशात महत्त्वाच्या सूचना करण्यात आल्या आहेत. दरम्यान राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी याबाबत आज आदेश जारी केला आहे.

१. राज्यातील मंत्रालय, अधिनस्त कार्यालये, विधानभवनासह सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये व खासगी आस्थापनांमध्ये कार्यरत अधिकारी व कर्मचारी तसेच कार्यालयात कामकाजास्तव येणाऱ्या सर्व अभ्यागतांनाही कार्यालय व कार्यालयाच्या आवारात नाक व तोंड पूर्णत: झाकले जाईल अशा पद्धतीने मास्क वापरणे बंधनकारक राहील.

२. या सर्व कार्यालयांमध्ये सेवेत असलेल्या कर्मचारी व अधिकारी यांच्या कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्र पूर्ण झाल्याची खातरजमा संबंधित कार्यालयाच्या कार्यालय प्रमुख वा आस्थापना प्रमुख यांनी करावी.

लसीकरण पूर्ण झाल्याचे अंतिम प्रमाणपत्र संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून घ्यावे. ज्या कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी काही अडचण असल्यास लसीकरणासाठी विशेष सत्र आयोजित करावे किंवा नजीकचे केंद्र किंवा सार्वजनिक आरोग्य विभागात संपर्क करून त्याची पूर्तता करून घ्यावी.

३. मास्कचा सुयोग्य वापर आणि लसीकरण पूर्ण करून घेणे यावर देखरेख करण्यासाठी संबंधित विभाग प्रमुख वा कार्यालय प्रमुख यांनी आस्थापना अधिकारी किंवा अधिकाऱ्याला नामनिर्देशित करावे.

४. सर्व कार्यालयांत मास्क अनिवार्य असल्याने कर्मचारी, अधिकारी किंवा अभ्यागत हे कार्यालयात किंवा आवारात विनामास्क आढळल्यास संबंधित नामनिर्देशित अधिकाऱ्याला नियम मोडणाऱ्याकडून दंड वसुलीचे अधिकार असतील.

५. दंड आकारणी केल्यावर त्याची पावती दिली जाईल. ती रक्कम कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्याकडे जमा होईल व तिथून महसुलात जमा करण्यात येईल.