अहमदनगर Live24 टीम, 02 ऑक्टोबर 2021 :- जिल्ह्यातील गुन्हेगारीमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा धोका निर्माण झाला आहे. नुकतेच अशीच एक धक्कादायक घटना नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात घडली आहे.

‘आमची पळवून नेलेली मुलगी व तिला पळवून नेणारा कुठे आहे, याची माहिती दे,’ अशी दमदाटी करीत मुलीच्या नातेवाइकांनी भनगडेवाडी येथील हॉटेलचालक आक्रोश ठोकळ यांचे अपहरण केले.

त्यांच्या चेहऱ्यावर ब्लेडने वार करून, चेहरा पाण्यात बुडवून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी ठोकळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पारनेर पोलिस ठाण्यात एका महिलेसह १५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान या धक्कादायक घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी आहे की, भनगडेवाडी येथील हॉटेल व्यावसायिक ठोकळ यांना, ‘मुलीला पळवून नेणारा पप्प्या सिनारे कुठे आहे,’

असे विचारून मुलीच्या नातेवाइकांनी लाकडी दांडक्याने व लोखंडी पाइपने मारहाण केली. त्यानंतर ठोकळच्या गालावर ब्लेडने वार करून, पाण्याने भरलेल्या बादलीत तोंड बुडवून जिवे मारण्याचा प्रयत्न केला.

तसेच, ‘आमची मुलगी सापडली नाही, तर तुला माळशेज घाटात मारून टाकू,’ असा दम दिला. ठोकळ यांच्या फिर्यादीवरून पारनेर पोलिसांनी १५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.