अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2021 :- सध्या रब्बीतील गहु हरभरा तुर, मका, ऊस, कांदा या पिकांना सध्याच पाण्याची गरज आहे. अनेकांच्या विहीर, कुपनलिकांची पाणीपातळी खालावली असून शेतकर्‍यांची पिके सध्या जोमदार आहेत.(farming)

मात्र पिकांना वेळीच पाणी मिळाले नाही तर पिके जळून खाक होऊन जाण्याची भिती नेवासा तालुक्यातील सलाबतपूर परिसरात निर्माण झाली आहे.

खरीप पिकांची अस्मानी संकटाने केली दयनीय अवस्था… जास्तीच्या पावसाने खरीप पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले होते. अनेक शेतकर्‍यांना सुरुवातातीला दुबार पेरणीच्या संकटाला सामोरं जावं आणि नंतर पुन्हा आस्मानी संकटाला. यामुळे शेतकर्‍यांची अर्थव्यवस्था पुरती कोलमडली आहे.

शेतकर्‍यांचा कापूस, सोयाबीन पावसाच्या अवकृपेने पूर्णपणे वाया गेला होता. तसेच तुर पिकावर मर रोग आल्याने तुर उत्पादनात कमालीची घट झाली आहे.

खरिपाची वाट लागल्याने आधीच शेतकरी हवालदिल झाले आहे. आता शेतकर्‍यांना रब्बी पिकांतून चांगले उत्पादन मिळण्याची आशा आहे.

मात्र विहिर व कुपनलिका यांची पाणीपातळी खालावली असल्याने बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. त्यामुळे लवकरात लवकर मुळातून आवर्तन सोडून शेती पिके व शेतकर्‍यांनाही वाचवा, अशी मागणी परिसरातून होत आहे.