अहमदनगर Live24 टीम, 21 ऑक्टोबर 2021 :-  मोहंमद पैगंबर जयंती (ईद मिलादुन्नबी) निमित्त फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने पटवर्धन चौक येथील ग्रीन स्टार एकता प्रतिष्ठानच्या युवकांना नेत्रदान संकल्प अर्जाचे वाटप करुन नेत्रदानाबद्दल जागृती करण्यात आली.

तर मरणोत्तर नेत्रदान जास्तीत जास्त होण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी फिनिक्स फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे, सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग,

ग्रीन स्टारचे शोएब सय्यद, कुद्दुस शेख, आरिफ शेख, मुबीन शेख, अख्तर शेख, अफरोज शेख आदी युवक उपस्थित होते. जालिंदर बोरुडे म्हणाले की, नेत्रदानासह देहदान करणे ही काळाची गरज बनली आहे. गैरसमजुत व अंधश्रध्देमुळे देशात अवयवदान करण्यास घाबरतात.

नेत्रदानासह व देहदान चळवळ गतीमान करण्यासाठी जागृकता निर्माण करण्याची गरज आहे. ही चळवळ गतीमान झाल्यास अनेकांना नवदृष्टी मिळणार असून, या चळवळीत युवकांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे सांगितले.

तर एका व्यक्तीच्या नेत्रदानाने दोन व्यक्तींच्या जीवनात प्रकाश निर्माण होतो. भारतात अनेक अंध व इतर रुग्ण विविध अवयवांच्या प्रतिक्षेत आहे.

अवयव दानासारखे दुसरे पुण्य नसून, मरणानंतरही त्या व्यक्तीला त्याचे पुण्य मिळत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.