अहमदनगर Live24 टीम, 20 ऑक्टोबर 2021 :-नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी फटाके बंदीचा निर्णय जाहीर करणार असल्याचे समजल्यानंतर या निर्णयाच्या विरोधात मनसेच्यावतीने एस.टी.स्टॅण्ड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे फटाके फोडून निषेध व्यक्त करण्यात आला.

जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, सचिव नितीन भुतारे, विद्यार्थी सेना प्रमुख परेश पुरोहित, संकेत व्यवहारे, संतोष साळवे, अशोक दातरंगे, समर्थ उकांडे, संकेत होसिंग, अक्षय नक्का आदि उपस्थित होते. यावेळी मनसेचे नितीन भुतारे म्हणाले की, गेल्या दीड वर्षांपासून कोरोनामुळे अनेक सण-उत्सवावर शासनाने बंदी घातली होती.

आता परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याने निर्बंध उठविले जात आहेत. यातच दिवाळी हा सर्वांत मोठा व आनंदाच्या सणात फटाके हा महत्वाचा घटक असल्याने ते उडविण्यावर बंद घालणे म्हणजे सरकार हे पुर्णत: हिंदू विरोधात काम करत असल्याचे दिसत आहे.

त्याचप्रमाणे फटाका उद्योगावर अनेकांचे संसार आहेत, आज दिवाळी तोंडावर असतांना अनेक व्यापार्‍यांनी कर्ज काढून फटाक्यांची खरेदी केली आहे आणि अचानकपणे सरकार फटाक्यांवर बंदी घालत आहेत. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचा बालहट्ट पुरविण्याकरिता उध्दवठाकरे,

महविकास आघाडी सरकार असे निर्णय घेतात जर उध्दव ठाकरे व आदित्य ठाकरे यांना फटाक्यांचे प्रदूषण सहन होत नसेल तर दिवाळी होईपर्यंत त्यांनी परदेशात निघून जावे असं नितीन भुतारे यांनी म्हटले आहे.

हा कोणता तुघलकी निर्णय म्हणावा?, या निर्णयास आमचा विरोध आहे, आम्ही राज्यात फटाके वाजविणार जर त्यास विरोध झालाच तर संबंधित अधिकार्‍यांच्या दालनात फटाके उडवू, असे भुतारे यांनी यावेळी सांगितले.