अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2021 :-  पतीने पत्नीला मारहाण केल्याच्या अनेक घटना समाजात घडत असतात. मात्र, पत्नीने रागाच्या भरात आपल्या पतीला लाकडी बॅटने व लाथाबुक्क्यांनी धोपटून काढल्याची घटना नुकतीच राहुरी तालुक्यात घडली आहे.

पतीने थेट पोलीस ठाणे गाठून आपल्याच पत्नी विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. नंदू लक्ष्मण आघाव (वय 47 वर्षे, राहणार रेल्वे स्टेशन, राहुरी) यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले,

दि. 2 डिसेंबर रोजी सव्वासात वाजेच्या सुमारास त्यांची पत्नी आरोपी निता नंदू आघाव ही मोबाईलवर कोणाबरोबर बोलत होती. नंदू आघाव यांनी तिला विचारले, कोणाबरोबर बोलत आहेस? तेव्हा ती म्हणाली, मी फोनवर बोलत नव्हते.

या गोष्टीचा तिला राग आला. तेव्हा तिने घरातील लाकडी बॅटने नंदू आघाव यांच्या डोक्याला मारहाण केली. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली.

नंदू लक्ष्मण आघाव यांनी ताबडतोब राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसां समोर घडलेला प्रकार कथन केला. घडलेला प्रकार ऐकून पोलीस देखील आश्चर्य चकित झाले.

नंदू आघाव यांच्या फिर्यादीवरून त्यांची पत्नी निता नंदू आघाव हिच्या विरोधात मारहाण व जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.