अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2021 :- कापसाचे सूत असल्याचे भासवून गोवा राज्य निर्मित असलेेले लाखो रुपयांचे मद्य वाहतूक करणारा कंटेनर पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागीय भरारी पथकाने संगमनेर तालुक्यातील वेल्हाळे शिवारात पकडला.

याप्रकरणी सूर्यनारायण रामचंद्र शिरसाट (वय 35, रा. विलेपार्ले (पुर्व) मुंबई) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच यामध्ये 69 लाख 13 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल पथकाने जप्त केला आहे.

गोवा राज्यात निर्मित असलेले मद्य मोठ्या प्रमाणावर कंटेनरमधून संगमनेरच्या दिशेने येणार असल्याची माहिती पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. त्यांनी तात्काळ आपल्या पथकाला कारवाईचे आदेश दिले.

त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे विभागाच्या भरारी पथकाने वेल्हाळे शिवारात एक कंटेनर पकडला. या कंटेनरच्या चालकाकडे पथकातील अधिकार्‍यांनी चौकशी केली असता चालकाने कापसाचे सूत नेत असल्याचे सांगितले.

परंतु खात्रीशीर माहिती मिळाली असल्याने गाडीमध्ये मद्यच असल्याच्या संशयावरून अधिकार्‍यांनी सदर वाहनाची मागील बाजूस असलेले सिल उघडून तपासणी केली.

सदर वाहनाच्या हौद्यामध्ये गोवा राज्य निर्मित व विक्रीस परवानगी असलेला मोठा दारूसाठा सह एक कंटेनर असा एकूण अंदाजे किंमत 69 लाख

13 हजार 300 इतक्या किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी सूर्यनारायण रामचंद्र शिरसाठ याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.