IMD Alert : राज्यात मान्सूनचा (Monsoon) दुसऱ्या टप्प्यातील प्रवास सुरु आहे. महाराष्ट्रातील (Maharashtra) विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. येत्या काही तासांत आणखी मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

भारतीय हवामान खात्याने (IMD) राज्यात पावसाचा अंदाज वर्तवल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी गुरुवारी अनेक जिल्ह्यांतील अधिकाऱ्यांना बचाव पथके आणि मदत यंत्रणा सज्ज राहण्याचे निर्देश दिले.

मुख्यमंत्री कार्यालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांच्या अधिकाऱ्यांना पूर्णपणे तयार राहण्यास सांगितले आहे. पुढील चार ते पाच दिवस राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.

नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स (NDRF) ला महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या दक्षिणेकडील राज्यांशी समन्वय साधण्यास सांगण्यात आले आहे, कारण गेल्या 48 तासांत मुसळधार पाऊस झाला आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

याआधी सोमवारी मुंबईत पावसाची शक्यता पाहता IMD ने ऑरेंज अलर्ट जारी केला होता. सोमवारी आणि मंगळवारी मुंबई आणि आसपासच्या परिसरात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. सूत्रानुसार, मुंबईतील ‘अंधेरी मेट्रो’सारखे सखल भाग पाण्याखाली गेले आहेत. मुंबईत सकाळी 8 वाजेपर्यंत गेल्या 24 तासात 51.35 मिमी पाऊस झाला.