अहमदनगर Live24 टीम, 20 ऑक्टोबर 2021 :- राष्ट्रीय महामार्गांसाठी जमिनी संपादित करण्यासंदर्भात नुकताच एक शासननिर्णय निर्गमित करण्यात आला होता. त्या निर्णयामुळे सुरत हैद्राबाद प्रस्तावित महामार्गमाध्ये जमिनी जाणारे नगर जिल्ह्यातील शेतकरी व्यथित झाले होते.

यासंदर्भात राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेवून चर्चा केली. हा निर्णय सध्या अस्तित्वात असलेल्या महामार्गालगतच्या जमिनीसाठी लागू असणार आहे. सुरत हैद्राबाद हा पूर्णपणे नवीन महामार्ग असल्याने त्यासाठी लागणाऱ्या जमिनींच्या संपादनासाठी हा शासन निर्णय लागू असणार नाही.

त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. असे राज्यमंत्री तनपुरे यांनी सांगितले. ना. तनपुरे यांनी याबाबत अधिक माहिती देताना म्हणाले, सुरत-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गात जिल्ह्यातील अनेक गावांतून जमिनी संपादित केल्या जाणार आहेत. आपल्या नगर, राहुरी, पाथर्डी मतदारसंघातील बर्‍याच गावांतून यासाठी भूसंपादन करण्यात येणार आहे.

नवीन अध्यादेशाची माहिती मिळाल्याने मिळणार्‍या भरपाईबाबत शेतकर्‍यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. यासाठी अनेक शेतकर्‍यांचे शिष्टमंडळ आपल्याला स्वतः भेटले. मुंबई येथे याबाबत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याी शेतकर्‍यांमधील संभ्रमाबाबत चर्चा केली.

त्यावेळी नवीन महामार्ग जाताना करण्यात येणार्‍या भूसंपादनाची प्रक्रिया व या नवीन अध्यादेशाचा कोणताही संबंध नाही. शेतकर्‍यांना पूर्वीप्रमाणेच 2.1 या दरानेच भरपाई मिळणार असून नवीन अध्यादेशानुसार जुन्या महामार्गालगतच्या जमिनींसाठी नवीन नियम लागू आहेत.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महामार्ग करताना राज्यात ज्यादा पैसे द्यावे लागत असल्याने कामे पूर्णत्वास नेणे अवघड होईल, अशी माहिती देताना काही कामे थांबविण्यात आली होती. परंतु नवीन महामार्गाच्या भरपाईबाबत कोणतेही बदल करण्यात आले नसल्याने शेतकर्‍यांनी घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे ना. तनपुरे यांनी सांगितले.