file photo

अहमदनगर Live24 टीम, 26 सप्टेंबर 2021 :- ग्रामीण भागातील लोणी प्रवरा सारख्या गावात डॉ. राजेंद्र विखे पाटील यांनी शिक्षणासह वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय काम केले आहे. त्यासोबतच सावित्रीाबाई फुले पुणे विद्यापीठ मोठे करण्याचे योगदानही त्यांचेच आहे.

त्यांचा सत्कार करताना मी स्वतःला भाग्यवान समजतो, अशा शब्दात भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी डॉ. राजेंद्र विखे पाटील यांच्या षष्टयब्दीपूर्ती निमित्ताने कौतुक केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात डॉ. राजेंद्र विखे पाटील यांच्या षष्टयद्वीपुर्ती कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी समितीचे अध्यक्ष राजेश पांडे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमळकर, महापौर मुरलीधर मोहोळ, अनिल मस्के, सोमनाथ पाटील, अशोक सावंत, सुनेत्रा पवार, प्रवरा विद्यापीठाचे कुलगुरू मगरे सर उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले, ग्रामीण भागात आरोग्य सुविधा देण्यासाठी डॉ. राजेंद्र विखे पाटील यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. त्याबरोबरच कठीण परिस्थिती असतानाताही त्यांनी शिक्षणाचे शिवधनुष्य लिलया पेलले आहे. त्यामुळेच हजारो गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी निर्माण झाली आहे.

सामाजिक जीवनात काम करताना डॉ. विखे पाटील यांनी शिक्षणक्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. त्यामुळे डॉ. राजेंद्र विखे पाटील यांच्या षष्टयद्वीपुर्ती सोहळ्यात सहभागी होताना मला विशेष आनंद झाला. कोरोना कालावधी सर्वप्रथम कोवीड हॉस्पिटल उभारण्याचे कामही त्यांनी केले असल्याचे पाटील यांनी नमूद केले.

डॉ. राजेंद्र विखे पाटील म्हणाले, शिक्षणासह वैद्यकीय क्षेत्रात काम करताना अनेकांच्या सहकार्यामुळे प्रवास सुखकर झाला. माझ्यावर प्रेम करणारे कुटूंब, नातलग, सहकारी, मित्र, अधिकारी, कर्मचाऱ्यामुळे शक्य झाले आहे. कार्यक्रमानिमित्त एकत्रित आलेल्या सर्वांचे मी मनःपूर्वक आभार मानले.

याप्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमळकर यांनी विद्यापीठाच्या जडणघडणीत डॉ. विखे पाटील यांचे मोठे योगदान असल्यामुळेच विविध नाविण्यपुर्ण उपक्रमांची सुरुवात झाल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्तावीक राजेश पांडे, सुत्रसंचालन डॉ. संजय चाकणे, आभार प्रसेनजीत फडणवीस यांनी मानले.