अहमदनगर Live24 टीम, 05 नोव्हेंबर 2021 :- सहकारी साखर कारखानदारीला माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी योग्य दिशा देण्याचे काम केले असून सहकारासमोर पुन्हा खाजगीचे आव्हान उभे राहिले आहे.

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखाना त्या तुलनेत हे आव्हान समर्थपणे पेलेल अशी ग्वाही संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी दिली आहे.

सहकारमहर्षि शंकरराव कोल्हे कारखाना कार्यस्थलावर सालाबाद प्रमाणे याही वर्षी लक्ष्मीपूजन माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या हस्ते संपन्न झाले त्याप्रसंगी ते बोलत होते.

कोल्हे पुढे म्हणाले की, सहकारमहर्षि कोल्हे कारखान्याची अत्याधुनिकरनाकडे वाटचाल सुरू आहे. कारखान्याचे संचालक मंडळ, व्यवस्थापन, शेतकी,

उस विकास विभागाने शेतक-यांचे प्रती हेक्टरी उस उत्पादन वाढविण्यासाठी धडक कृती कार्यक्रम हाती घेत ऊस लागवडीवर भर देऊन पुढील पाच वर्षात कोल्हे कारखाना जिल्हयात नंबर वन मध्ये दिसेल असे प्रतिपादन कोल्हे यांनी केले.

कारखान्यांने उसाची गव्हाण ते कार्यालय या सर्व विभागांचे अत्याधुनिकरण, संगणकीकरण करून ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांसाठी एक खिडकी योजना राबविणारा राज्यातील पहिलाच कारखाना ठरणार आहे. केंद्र शासनाबरोबर 90 लाख लिटर इथेनॉल पुरवण्या बाबतचा करार केला आहे.

तसेच पाच लाख टन कच्ची साखर निर्यात करणार आहे असे सांगून त्यांनी कोरोना महामारीत कारखाना व्यवस्थापनाने केलेल्या कामाची माहिती देऊन कामगारांचे शंभर टक्के दोन्ही लसींचे लसीकरण पूर्ण केले असल्याचे सांगितले.