अहमदनगर Live24 टीम, 28  डिसेंबर 2021 :- श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील रुक्मिणी मातेच्या मूर्तीची अज्ञात समाजकंटकांनी विटंबना केल्याची घटना शिर्डी येथील जुन्या पिंपळवाडी रोडलगत वैदूवाडीमध्ये घडली आहे.(shirdi)

यामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. शिर्डी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन हे कृत्य करणार्‍यांंवर कारवाईचे आश्वासन दिल्याने जमाव शांत झाला.

याबाबत अधिक माहिती अशी कि, शिर्डी येथील जुन्या पिंपळवाडी रोडलगत वैदूवाडी येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आहे. या मंदिरातील देवी रुक्मिणी यांच्या मूर्तीची अज्ञात समाजकंटकांनी विटंबना केल्याने मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी जमा झाली होती.

या घटनेची माहिती शिर्डी पोलीस स्टेशनला मिळताच पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी हजर झाला. यावेळी शिर्डीचे पोलीस उपविभागीय अधिकारी संजय सातव व पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी शांततेचे आवाहन केले.

मातेची विटंबना करणार्‍या अज्ञात समाजकंटकांचा त्वरित शोध घेतला जाईल. त्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन यावेळी पोलीस अधिकार्‍यांनी दिले. या घटनेबाबत पंडित सिताराम गुडे यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.