अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2021 :- मंत्रीमंडळात बसलेले मंत्री आम्‍ही शेतक-यांची मुले असल्‍याचे छातीपुढे काढून मोफत वीज देण्‍याची भाषा करीत होते, परंतू आता तेच बांधावर जावून शेतक-यांचे वीज कनेक्‍शन कट करत आहेत.

मागील दोन वर्षात महाविकास आघाडी सरकार राज्‍यातील शेतक-यांना दमडीचीही मदत करु शकलेले नाही. पीक विमा कंपन्‍या शेतक-यांना फसवत राहील्‍या तरी सरकार धिम्‍म होवून पाहत बसले. सरकार नावाची व्‍यवस्‍थाच राज्‍यात अस्तित्‍वात राहीली नसल्‍याने विकासची प्रक्रीया ठप्‍प झाली.

विरोधी आमदारांना निधीच द्यायचा नाही हा सरकारचा नवा फंडा आता समोर आला असल्‍याची टिका भाजपा नेते आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केली. तालुक्‍यातील आडगांव बुद्रूक ग्रामपंचायतीने १४ व्‍या वित्‍त आयोगातून सुमारे ४४ लाख रुपयांच्‍या विकसीत केलेल्‍या कामांच उद्घाटन आणि भूमिपुजन आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले.

चंद्रभान शेळके यांच्‍या अध्‍यक्षतेखाली झालेल्‍या या कार्यक्रमास सरपंच सौ.पुनम बर्डे, उपसरपंच अशोक लहामगे, पंचायत समिती सदस्‍य काळू रजपुत, संतोष ब्राम्‍हणे, आडगांव खुर्दचे सरंपच प्रदिप गायकवाड, चंद्रकांत शेळके, रावसाहेब साळवे, बाळासाहेब साळवे, शासदा साळवे,

बाळासाहेब बोधक, भिमराज शेळके, सुनिल बर्डे, गटविकास आधिकारी समर्थ शेवाळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्रीनिवास वर्पे आदि याप्रसंगी उपस्थित होते. गावातील शिवार रस्‍त्‍याबाबत ग्रामस्‍थांनी उपस्थित केलेल्‍या प्रश्‍नांचा धागा पकडून आ.विखे पाटील म्‍हणाले की, मागील दोन वर्षांपासुन सरकारकडे आपण शिवार रस्‍त्‍यांसाठी निधी उपलब्‍ध करुन देण्‍याची मागणी करत आहोत.

मात्र सरकार विकास कामांना पैसे देत नाही, विरोधी आमदारांना निधीच द्यायचा नाही हा नवीन फंडा आता महाविकास आघाडी सरकारने पुढे आणला आहे. मात्र तरीही शिवार रस्‍त्‍यांच्‍या कामासाठी आपलापाठपुरावा सुरुच राहील अशी ग्‍वाही त्‍यांनी दिली.

राज्‍यात सरकार नावाची कोणतीही व्‍यवस्‍था सध्‍या दिसत नाही हेच महाविकास आघाडी सरकार सत्‍तेवर आल्‍यापासुन, कोणताही समाज घटक समाधानी नाही. कोव्‍हीड संकटातही पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्‍या माध्‍यमातून केंद्र सरकारने दिलेल्‍या मदतीमुळेच सामान्‍य माणसाला दिलासा मिळाला.

राज्‍य सरकारची कवडीचीही मदत या संकटात झाली नाही. राज्‍य सरकार फक्‍त केंद्राकडे बोट दाखवून वेळ मारुन नेत असल्‍याचे आ.विखे पाटील म्‍हणाले. नैसर्गिक आपत्‍तीमुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटात सापडला आहे. सरकार फक्‍त घोषणा करते, शेतक-यांच्‍या पदरात दमडीचीही मदत मिळू शकलेली नाही.

मंत्री मंडळात बसलेली आम्‍ही शेतक-यांची मुल आहोत असे सांगणारेच शेतक-यांचया बांधावर जावून वीज कनेक्‍शन कट करीत आहेत. १०० युनिट पर्यंत मोफत वीज देण्‍याची आश्‍वासनं उर्जामंत्र्यांनीच दिले होते, त्‍याचे काय झाले? असा सवाल उपस्थित करुन आ.विखे पाटील म्‍हणाले की, एसटी कर्मचारी आत्‍महत्‍या करीत आहेत.

सरकार मधील मंत्री आणि नेते मात्र नाच गाण्‍यात दंग असल्‍याचा टोला आ.विखे पाटील यांनी लगावला. याप्रसंगी चंद्रभान शेळके यांचे भाषण झाले. आडगांव ग्रामस्‍थांच्‍या वतीने आ.विखे पाटील यांचा सत्‍कार करण्‍यात आला.