अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2022 :-  आजही अनेक ठिकाणी पैशाची नड भागवण्यासाठी सावकाराचे साहाय्य घेतले जाते. अन शेवट पीडित त्याच्या सावकाराच्या कचाट्यात सापडतो आणि जे आहे ते सगळेच हरवून बसतो.

दरम्यान सावकारकीचा वाढता फास जिल्ह्यासाठी धोकादायक बनू लागला आहे. यातच जिल्ह्यातील अकोले तालुक्यात खासगी सावकारशाहीने सध्या मोठा उच्छाद मांडला असून अनेकांची पिळवणूक यातून सुरू आहे.

अकोले शहर आणि ग्रामीण भागातही खासगी सावकारशाहीचा सुळसुळाट झाला आहे. राष्ट्रीयीकृत बँका, सहकारी बँका आणि पतसंस्थामध्ये सर्वांनाच तातडीने कर्जाची सुविधा मिळत नाही.

छोटे व्यापार,शेती उभारणी किंवा इतरही अनेक दैनंदिन गरजांच्या पुर्ततेसाठी लोकांना या सावकारांचे उंबरे झिजवावे लागतात.

लोकांची निकडीची गरज लक्षात सावकार दरमहा दरशेकडा पाच टक्के ते दहा-पंधरा टक्के असा बेहिशोबी व्याजदर आकारतो.

शिवाय कोरे धनादेश,कोरे मुद्रांक यावर गरजुंची सही घेऊन वेळप्रसंगी मोठी आकडेवारी यावर टाकून फसवणूक केली जाते. खासगी सावकारांच्या दादागिरीमुळे अनेकांना जीवन नकोसे झाले आहे.

अकोले तालुक्यातील काही खासगी सावकारांची सावकारकी राजकीय वरदहस्तातून सुरू आहे.काही राजकीय व्यक्तींचाच पैसा यात गुंतविला गेल्याची माहिती आहे.

सध्या स्थितीला अकोले शहर आणि ग्रामीण भागात मिळून शेकडो अनधिकृत सावकारांनी आपला अवैध सावकारीचा व्यवसाय जोरात सुरू ठेवला आहे.

सहकार खात्याकडे या विरोधात लोकांनी तक्रार दाखल केल्यास सहकार खाते आणि पोलीस प्रशासन मिळून यावर अंकुश येऊ शकतो. भविष्यातील धोका ओळखून प्रशासनाने आक्रमक भूमिका घेणे गरजेचे बनले आहे.