file photo

Ahmednagar News : श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथे अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत एकाच रात्री तिन ठिकाणी चोरी केली. यात कोळाई देवी मंदिरातील दानपेटी, एक बियर शॉप आणि किराणा दुकान तोडून रोख रकमेसह एक ते सव्वा लाखाचा मुद्देमाल चोरुन नेला आहे.

या परिसरात मागील काही दिवसात वाढलेल्या चोऱ्यांच्या घटनामुळे नागरिकांनी धास्ती घेतली आहे. या बाबत सविस्तर असे की, कोळगावचे आराध्य दैवत असलेल्या कोळाईदेवी मंदिरात शनिवारी रात्री अज्ञात चार ते पाच चोरट्यांनी मंदिराच्या दरवाजाचे कुलूप तोडून मंदिराची दानपेटी चोरुन नेली.

नंतर मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या किराणा दुकानाचे शटरचे कोंडे तोडून दुकानातील १५ ते २० हजार रुपयांचे किराणा साहित्य व नंतर नगर दौंड महामार्गावरील बियर शॉपीच्या शटर उचकटून ८० हजार ते एक लाख रुपये किमतीचे बियरचे सुमारे १५ ते २० बॉक्स चोरले.

चोरट्यांनी मंदिरासह दोन्ही ठिकाणी काही महिन्याच्या अवधी नंतर परत चोऱ्या केल्या असून चोरटे मंदिरातील सीसीटीव्हि मध्ये कैद झाले आहेत. या बाबत बेलवंडी पोलिस ठाण्यात मंदिराचे पुजारी राजेंद्र गुरव यांनी गुन्हा दाखल केला आहे.