अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :- देशात शनिवारपासून सुरू करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेंतर्गत आतापर्यंत एकूण ७,८६,८४२ आरोग्य कर्मचाऱ्यांना लस टोचविण्यात आली आहे.
आतापर्यंत लसीमुळे गंभीर दुष्परिणाम ओढावल्याचे कुठलेही प्रकरण समोर आले नाही, असा दावा सरकारने केला आहे. एकूण २० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये बुधवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत १,१२,००७ जणांना कोरोना लस देण्यात आली.
त्यामुळे लस घेतलेल्यांचा आकडा ७,८६,८४२ इतका झाला आहे. लस घेतल्यानंतर १० जणांना त्रास जाणवला आहे. यात दिल्लीतील ४, कर्नाटकातील २, उत्तराखंड, छत्तीसगड, राजस्थान आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
देशात १६ जानेवारीपासून देशभरात कोरोना लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. यामध्ये तीन कोटी आरोग्य कर्मचारी आणि पहिल्या फळीतील कोरोना योद्ध्यांना लस देण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे.
मात्र आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये लस घेण्यासाठी उत्साह कमी दिसत आहे. अशातच लस घेतल्यानंतर मृत्यूची संशयास्पद प्रकरणे समोर येत असल्याने खळबळ उडत आहे.
यापूर्वी उत्तर प्रदेशात कोरोनाची लस घेतल्यानंतर महिपाल सिंह यांचा मृत्यू झाल्याचा आरोप झाला होता.कोरोनाची लस घेतल्याच्या २४ तासांनंतर त्यांची तब्येत अचानक बिघडली. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले,
परंतु उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. दुसऱ्या प्रकरणात कर्नाटकमधील बेल्लारीच्या राज्य आरोग्य विभागात काम करणाऱ्या ४३ वर्षीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याचा आरोप झाला होता.