भारत

नगरचे १५० भाविक प्रयागराजमध्ये अडकले !

Published by
Sushant Kulkarni

३१ जानेवारी २०२५ अहिल्यानगर : संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या प्रयागराज येथील कुंभ मेळ्यात २९ जानेवारी रोजी मोठी दुर्घटना घडली.भाविकांचा अक्षरशः महासागरच प्रयागराजला उसळला आहे.चेंगराचेंगरीत तब्बल ३० भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर शेकडो जखमी झाले.नगरचेही भाविक कुंभमेळ्यात दाखल झाले असून,सुमारे १५० भाविक प्रयागराजमध्ये वाहतूक कोंडीत अडकले आहेत.त्यांना तत्काळ मदत करण्यात यावी,अशी मागणी करण्यात आली आहे.

जखणगावचे सरपंच डॉ. सुनील गंधे यांनी नगरमधील अनेकांना तेथील विदारक परिस्थितीचे व्हिडीओ सोशल मिडियाद्वारे पाठवून जिल्हा प्रशासनाला याबाबत अवगत करत मदत मिळवून देण्याचे आवाहन केले आहे. सरपंच डॉ. गंधे यांनी सांगितले की, जखणगाव व परिसरातील १५० भाविक खाजगी आराम बसने २६ जानेवारीला नगरहून प्रयागराजकडे रवाना झाले होते.२९ जानेवारीला मौनी अमावस्येनिमित्त शाही स्नानासाठी प्रयागराजमध्ये १० कोटी भाविक जमा झाले.

तेथे चेंगराचेंगरीची दुर्घटना होवून काही भाविक मृत्युमुखी पडले.मात्र नगरचे भाविक सुखरूप आहेत.त्यांनी शाही स्नानाचा लाभही घेतला.नगरचे सर्व भाविक अयोध्येकडे निघाले मात्र प्रयागराज मध्ये एवढ्या मोठ्या संख्येने भाविक आलेले असताना तेथील प्रशासनाने भाविकांच्या सोयी सुविधांकडे व्यवस्थित लक्ष दिलेले नाही.पार्किंग व्यवस्थेमध्ये सुद्धा अस्ताव्यस्तपणा व अनियमित्ता दिसून आली.परिणामी तेथे सध्या मोठी वाहतूक कोंडी होवून लाखो भाविक त्यात अडकून पडले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांचा संपर्क

सरपंच डॉ. सुनिल गंधे यांनी सोशल मिडीयावर केलेल्या मदतीच्या आवाहनानंतर माजी महापौर भगवान फुलसौंदर, किशोर गांधी यांनी जिल्हाधिकारी डॉ. सिद्धाराम सालीमठ यांची भेट घेत नगरच्या भाविकांना मदत मिळवून देण्याबाबत निवेदन देवून चर्चा केली.घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हाधिकारी सालीमठ यांनी प्रयागराज येथील प्रशासनाशी संपर्क साधत नगरच्या भाविकांना मदत मिळवून देण्याची विनंती केली असून ते सातत्याने याबाबत तेथील प्रशासनाच्या संपर्कात असल्याचे श्री.फुलसौंदर यांनी सांगितले.

Sushant Kulkarni