अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2021 :-आम आदमी पार्टीचे (आप) आमदार आणि दिल्लीचे माजी मंत्री सोमनाथ भारती यांना दिल्लीतील न्यायालयाने शनिवारी दोन वर्षे कैद व एक लाख रुपयांचा दंड ठोठावला.
२०१६ मध्ये त्यांच्यावर एम्सच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याचा आरोप होता. अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी रवींद्रकुमार पांडे यांनी ‘आप’च्या नेत्याला दोषी ठरवले आहे.
मात्र या शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात अपील दाखल करण्यासाठी भारती यांना जामीनही मंजूर करण्यात आला आहे. फिर्यादीनुसार, ९ सप्टेंबर २०१६ रोजी भारती यांनी सुमारे ३०० जणांसह अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) येथे जेसीबीने एक कपाऊंड भिंत पाडली होती.
त्यावेळी सुरक्षा कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याची तक्रार एम्सचे मुख्य सुरक्षा अधिकारी आर. एस. रावत यांनी दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.