भारत

चांद्रयान मोहिमेच्या यशानंतर आता भारताने सूर्य मोहीम हाती घेतली

Published by
Ahmednagarlive24 Office

India News : चांद्रयान मोहिमेच्या यशानंतर आता भारताने सूर्य मोहीम हाती घेतली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्त्रोकडून सूर्याचा अभ्यास करण्यासाठी ‘आदित्य- एल१ यान येत्या २ सप्टेंबर रोजी प्रक्षेपित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पुण्यातील खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकशास्त्राचे आंतरविद्यापीठ केंद्राचा या मोहिमेत सहभाग आहे.

सूर्याच्या अभ्यासासाठी भारताची ही पहिली समर्पित अंतराळ मोहीम आहे. सौर कोरोना अर्थात सूर्यावरील बाह्य आवरणाचे दूरस्थ अवलोकन आणि एल-१ (सूर्य – पृथ्वी लांग्रेजियन बिंदू) वर सौर हवेच्या यथास्थितीचा अभ्यास करण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.

एल – १ पृथ्वीपासून १५ लाख किमीवर आहे. ‘सौरयान एल-१’ केंद्राभोवती पोकळ कक्षेत प्रक्षेपित करण्यात येणार आहे. एल-१ बिंदूच्या चारही कक्षांमधून सूर्याचा अभ्यास करणे ‘आदित्य- एल१’ मोहिमेचे लक्ष्य आहे.

या ठिकाणाहून ग्रहण किंवा तत्सम कोणत्याही अडथळ्याशिवाय सातत्याने सूर्याचे निरीक्षण करता येईल. त्यामुळे सूर्यावरील घडामोडींचा आणि त्याच्या परिणामांचा अभ्यास करण्यास मदत होणार असल्याचे इस्त्रोने सांगितले.

ही सौर मोहीम पूर्णपणे स्वदेशी असून, देशातील काही संस्थांच्या सहभागातून ती तयार झाली असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. हे सौरयान दोन आठवड्यांपूर्वी आंध्रप्रदेशातील श्रीहरीकोटा येथील प्रक्षेपण केंद्रावर दाखल झाले आहे. येत्या २ सप्टेंबर रोजी सौरयानाचे प्रक्षेपण होण्याची शक्यता आहे, अशी माहिती इस्त्रोच्या अधिकाऱ्याने दिली.

यानासोबत सात पेलोड

१. आदित्य- एल १ या अंतराळ यानासोबत सात पेलोड अर्थात शास्त्रीय अभ्यासासाठी उपकरणे पाठवण्यात येणार आहेत. सातपैकी चार पेलोड थेट सूर्याचे निरीक्षण करतील.

२. पुण्यातील खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकशास्त्राचे आंतरविद्यापीठ केंद्राने सूर्यावरील अतिनील किरणांचा अभ्यास करण्यासाठीचे उपकरण तयार केले आहे.

३. या उपकरणाच्या मदतीने सोलार क्रोमोस्फियर आणि कोरोना यांचे निरीक्षण करण्यात येईल.

४. बंगळुरुतील भारतीय खगोलभौतिकशास्त्र संस्थेने व्हिजिबल एमिशन लाइन कोरोनाग्राफ पेलोड विकसित करण्यात भूमिका पार पाडली आहे.

Ahmednagarlive24 Office