मोठी बातमी ! संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्द

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2020 :- कोरोना व्हायरसमुळे यंदाचं संसदेचे हिवाळी अधिवेशन होणार नाही, असे केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. याबाबत संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी माहिती दिली आहे.

मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले, देशभरात कोरोनाचा संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी अनेक पक्षांनी हिवाळी अधिवेशन घेऊ नये असं मत मांडलं होतं. त्याचबरोबर संसद भवनाचं बांधकाम सुरू आहे.

त्यामुळे आता जानेवारी 2021 मध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी हिवाळी अधिवेशन रद्द करण्याबाबत एक पत्रक देखील जारी केलं आहे.

तसेच जोशी म्हणाले की, कॉंग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचा केंद्रबिंदू असलेल्या वादग्रस्त नवीन शेतीविषयक कायद्यांवर चर्चा करण्यासाठी अधिवेशन घ्यावं अशा मागणीचं पत्र दिलं होतं.

मात्र कोरोनामुळं अधिवेशन होणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यांनी सांगितलं की, आपण सर्व पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केली आहे, आणि कोविडमुळे अधिवेशन न घेण्याबाबत सर्वाचं एकमत आहे.

राजधानी दिल्लीमध्ये कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस पुन्हा वाढत आहे. त्या पार्श्वभूमिवर अधिवेशन रद्द करण्याचा निर्णय घेतला गेल्याची माहिती आहे. देशात देखील कोरोनाचा प्रकोप पुन्हा हळूहळू वाढत असल्याचं दिसत आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24