अहमदनगर Live24 टीम, 07 फेब्रुवारी 2021:- दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला ७५ दिवस उलटुन गेले असताना अद्याप न्याय मिळाला नाही, हे स्पष्ट करत केंद्रातील सरकार लोकशाहीचे की ठोकशाहीचे हा टोला राहुरीतील सर्वपक्षीय आंदोलकांनी लगावला.
दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून शनिवारी दुपारी नगर-मनमाड राज्य महामार्गावरील राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले.
आंदोलन सुरू करण्यापूर्वी जमलेल्या कार्यकर्त्यांनी भाजपविराेधी घोषणा दिल्या. आंदोलक कार्यकर्त्यांनी म्हटले शेतमालाला संरक्षण नसणारा काळा कायदा हा शेतकरी हिताचा नसून अंबानी व अदानीसाठी करण्यात आला.
या कायद्याच्या विरुद्ध शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असताना केंद्र सरकारला जाग येत नाही हे दुर्दैव ठरले. आंदोलन चिरडून टाकण्यासाठी केंद्र सरकार सत्तेचा व बळाचा गैरवापर करून शेतकऱ्यांवर दडपशाही व अत्याचार करीत आहे.
जगाचा पोशिंदा म्हणून ओळख असलेल्या शेतकऱ्यांच्या विरोधात आणलेले नवीन तीन काळे कायदे केंद्रातील भाजप सरकारने तत्काळ रद्द करावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.
या आंदोलनात जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गणेश खेवरे, अविनाश पेरणे, अॅड. राहुल शेटे, शेतकरी संघटनेचे प्रकाश देठे, प्रताप पटारे,
राष्ट्रवादी काँग्रेसचे संतोष आघाव, धिरज पानसंबळ, संदीप सोनवणे, रिपाइंचे बाळासाहेब जाधव, वंचित आघाडीचे अनिल जाधव, कांतीलाल जगधने, ज्ञानेश्वर जगधने, संजय संसारे, पांडू उदावंत, रमेश गायकवाड, जीवन गुलदगड आदी कार्यकर्ते सहभागी होते.