भारत

तुम्हाला माहिती आहे का हायपरलूप ट्रेन काय असते? देशात सुरू होणार हायपरलुप ट्रेन! मुंबई-पुणे प्रवास होईल 25 मिनिटात

Published by
Ajay Patil

सध्या वाहतुकीच्या क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बदल होत असून वेगवान आणि आरामदायी प्रवासाच्या दृष्टिकोनातून आणि वाहतुकीच्या सोयी उपलब्ध करण्यात येत आहे. याकरिता देशांमध्ये अनेक एक्सप्रेस वेची कामे हाती घेण्यात आलेली आहेत. तसेच वंदे भारत ट्रेनच्या माध्यमातून प्रवाशाना वेगवान आणि आरामदायी प्रवास उपलब्ध करून देण्यात येत आहे.

या सगळ्या निर्माण होत असलेल्या वाहतुकीच्या सोयीमुळे आता खूप मोठे अंतर देखील कमीत कमी वेळात पूर्ण करता येणे शक्य झालेले आहे. आपण आजपर्यंत रेल्वे, वंदे भारत ट्रेन, मेट्रो ट्रेन तसेच वंदे भारत मेट्रो ट्रेन इत्यादी नावे ऐकले असतील परंतु हायपरलूप ट्रेन हे नाव पहिल्यांदा ऐकले असेल.

सध्या काही दिवसांपासून मुंबई ते पुणे हायपरलूप ट्रेनची चर्चा सुरू असल्याचे आपल्याला दिसून येत असून येणाऱ्या कालावधीत या दोन शहरात दरम्यान जर ही ट्रेन सुरू झाली तर मुंबई ते पुणे दरम्यानचा प्रवास विमानापेक्षा वेगात म्हणजेच अवघ्या 25 मिनिटात पूर्ण होणार आहे.

विशेष म्हणजे महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून या हायपरलूप ट्रान्सपोर्टेशन सिस्टमला देखील मान्यता देण्यात आलेली असून राज्यात लवकरच हा प्रकल्प सुरू होईल अशी शक्यता आहे. खास करून मुंबई ते पुणे दरम्यान जे काही दिवसभरात लाखो प्रवासी प्रवास करतात त्यांच्यासाठी हा प्रकल्प खूप महत्त्वाचा ठरणार आहे.

 पुणे ते मुंबई अंतर होईल 25 मिनिटात पूर्ण

हायपरलूप हे एक महत्त्वाचे तंत्रज्ञान असून सार्वजनिक वाहतुकीकरिता याचा वापर करण्यात येणार असून महाराष्ट्रामध्ये मुंबई आणि पुणे दरम्यान हा प्रकल्प सुरू झाला तर या दोन्ही शहरादरम्यानचे अंतर 25 मिनिटात पूर्ण करता येणे शक्य होणार आहे. आता जर तुम्हाला मुंबईवरून पुण्याला किंवा पुण्यावरून मुंबईला यायचे असेल तर साडेतीन ते चार तास लागतात

व विमानाने प्रवास करायला 45 मिनिटांचा कालावधी लागतो. परंतु विशेष म्हणजे ही हायपरलूप ट्रेन विमानापेक्षा जास्त वेगवान असणार असून फक्त पंचवीस मिनिटांमध्ये हे अंतर पूर्ण करता येणार आहे. या दोन्ही शहरात दरम्यानचे अंतर 148 किलोमीटर इतके आहे.

 कशी असते हायपरलूप ट्रेन?

या ट्रेनमध्ये चुंबकीय तंत्रज्ञानाचा वापर केलेला असतो व ही ट्रेन पावडर बुलेट ट्रेन च्या दुप्पट वेगाने धावेल. हायपरलूप ट्रेन व्हॅक्युम ट्यूब सिस्टममधून जाणाऱ्या कॅप्सूल सारख्या हायपरलूप मधून बाराशे किमी प्रति तास वेगाने धावेल.ही कॅप्सूल कमी दाबाची असून यामध्ये घर्षण आणि कंपन कमी केले जाते व त्यामुळे या ट्रेनचा वेग वाढतो.

सध्या हायपरलूप ट्रेनची चाचणी सुरू असून व्हर्जिन ग्रुपने मुंबई ते पुणे हायपरलूप ट्रेनसाठी महाराष्ट्र सरकार सोबत करार केला असून याचे भाडे विमान प्रवासाच्या अर्ध्या किमतीत असणार आहे. तुम्हाला जर मुंबई ते पुणे दरम्यान जर या हायपरलूप ट्रेनच्या माध्यमातून प्रवास करायचा असेल तर त्याचे भाडे हजार ते दीड हजार रुपये पर्यंत असेल.

भारताच्या दृष्टिकोनातून बघितले तर मुंबई व पुणे व्यतिरिक्त ही ट्रेन चेन्नई, बेंगलोर तसेच दिल्ली आणि चंदीगड अशा ठिकाणी धावेल व साधारणपणे या सगळ्या प्रोजेक्टचे काम 2032 ते 33 पर्यंत पूर्ण होईल अशी एक शक्यता आहे. मुंबई आणि पुण्याचा विचार केला तर ही ट्रेन मुंबईवरून वांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स वरून धावायला सुरुवात करेल तर पुण्यातील वाकड पर्यंत जाईल.

Ajay Patil