Char Dham Yatra 2023 : देशातील अनेक राज्यांमधील हवामानात बदल झाल्याने अनेक भागामध्ये अवकाळी पावसाचा तडाखा पाहायला मिळत आहे. तसेच नुकतीच चार धाम यात्रेला सुरुवात झाली आहे. मात्र जोरदार पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे चार धाम यात्रा स्थगित करण्यात आली आहे.
चार धाम यात्रेला सुरुवात झाल्यानंतर भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. मात्र आता तेथील वातावरण खराब झाल्याने केदारनाथ यात्रा स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे आता चार धाम यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांनी हवामान विभागाच्या सल्ल्यानुसार यात्रा करावी.
२२ एप्रिलपासून यमुनोत्री आणि गंगोत्री यात्रेला सुरुवात झाली आहे. तर २५ एप्रिल रोजी केदारनाथ धामचे दरवाजे उघडले आहेत. तसेच २७ एप्रिल रोजी बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडले आहेत.
तुम्हीही आता चार धाम यात्रेसाठी जाणार असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. कारण पुढील ५ दिवसांसाठी हवामान खात्याकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे हवामान विभागाकडून काही सूचना देखील जारी करण्यात आल्या आहेत.
केदारनाथ धाममध्ये बर्फवृष्टी होत असल्याने शुक्रवारी सकाळी 11.30 नंतर यात्रेकरूंना पुढे जाण्याची परवानगी देण्यात आली नाही. तर ज्या दिवशी हवामान सामान्य होते त्या दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत प्रवाशांना येथून केदारनाथला पाठवले जात होते.
जिल्हा दंडाधिकारी मयूर दीक्षित यांनी सांगितले की, हवामान ठीक झाल्यानंतर त्यांना सोनप्रयाग येथून सामान्य दिवसांप्रमाणे पाठवले जाईल. हवामान खात्याच्या सतर्कतेमुळे अतिरिक्त खबरदारी घेण्यात येत असल्याचे सांगितले.
केदारनाथ धाममध्ये बर्फ पडत असल्याने अनेक भाविकांची प्रवासादरम्यान गैरसोय होत आहे. बर्फवृष्टी आणि पाऊस होत असल्याने भाविकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
पोलिस अधीक्षक विशाखा अशोक यांनी सांगितले की, बर्फवृष्टी होत आहे, त्यामुळे प्रवाशांनी हवामानाची माहिती घेऊनच प्रवासाचे नियोजन करावे. यात्रेकरूंना कोणत्याही संकटातून वाचवण्यासाठी ठिकठिकाणी मदत केली जात असल्याचे सांगितले.
डीएम-एसपीने हेल्पलाइन क्रमांक जारी केले
डीएम मयूर दीक्षित यांनी केदारनाथ धामच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आवाहन केले की, केदारनाथ धाममध्ये सतत होत असलेली बर्फवृष्टी लक्षात घेऊन हवामानाची माहिती घेऊनच प्रवास करा.
डीएम मयूर दीक्षित आणि पोलिस अधीक्षक विशाखा अशोक भदाणे यांनी केदारनाथ धामला येणाऱ्या यात्रेकरूंनी हवामानाच्या अंदाजानुसार प्रवास सुरू करण्याचे आवाहन केले आहे.
पाऊस आणि थंडी टाळण्यासाठी पुरेसे उबदार कपडे सोबत आणावेत. संवेदनशील ठिकाणी तसेच केदारनाथ धाममध्ये यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी पोलीस दल, DDRF, SDRF, YMF च्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा आपत्ती संचालन / प्रवास नियंत्रण कक्षाशी दूरध्वनी क्रमांक-01364-233727, टोल फ्री क्रमांक-1077, मोबाईल क्रमांक-8958757335 वर संपर्क साधावा.