अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :- भारताचे माजी वेगवान गोलंदाज चेतन शर्मा यांची गुरुवारी राष्ट्रीय निवड समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) क्रिकेट सल्लागार समितीने पाच सदस्यीय निवड समितीची नेमणूक केली आहे.
बीसीसीआयने (BCCI) गुरुवारी आभासी परिषदेदरम्यान अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीच्या नियुक्त्यांची घोषणा केली. चेतन शर्मा सध्याचे अध्यक्ष सुनील जोशी यांची जागा घेतील.
सदरम्यान बीसीसीआयने आज (24 डिसेंबर) तीन सदस्यांच्या निवडीसाठी मुलाखती घेतल्या. या मुलाखतीनंतर तिघांची नियुक्ती करण्यात आली. विशेष म्हणजे अध्यक्षपदासाठी माजी गोलंदाज अजित आगरकर यांचं नाव चर्चेत होतं.
मात्र, त्यांची निवड होऊ शकली नाही. निवड समितीच्या तीन जागांसाठी 13 उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यामध्ये अजित आगरकर, शिवसुंदर दास, नयन मोंगिया आणि मणिंदर सिंग यांच्यासारख्या प्रसिद्ध माजी क्रिकेटपटूंचा समावेश होता.
या सर्वांच्या मुलाखतीनंतर चेतन शर्मा, अभय कुरुविल्ला आणि देबाशीष मोहंती यांची निवड करण्यात आली . चेतन शर्मा यांनी 23 कसोटी सामने तर 65 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यांनी कसोटी सामन्यांमध्ये एकूण 61 तर एकदिवसीय सामन्यांमध्ये 67 विकेट घेतल्या आहेत.