अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचे पोलीस अधिकारी दविंदर सिंह यांच्या अटकेच्या मुद्यावरून काँग्रेसने सत्तारूढ भाजपला चांगलेच कोंडीत पकडले आहे. त्यास चोख प्रत्युत्तर देत पुलवामा दहशतवादी हल्ल्याचे खरे गुन्हेगार कोण आहेत? याचे उत्तर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी द्यावे, असे आव्हान भाजपने मंगळवारी दिले आहे.
काँग्रेस आणि तमाम विरोधी पक्ष हे भारतावर प्रहार करून पाकिस्तानला वाचविण्याचा केवलवाणा प्रयत्न करीत असल्याचा आरोप भाजपने केला. दहशतवाद्यांशी लागेबांधे असल्याप्रकरणी पोलीस अधिकारी दविंदर सिंग यांना नुकतीच अटक करण्यात आली आहे.
पोलीस अधिकारीच दहशतवाद्यांना मदत करीत असतील, तर मग ४० जवानांचा बळी घेणाऱ्या पुलवामा हल्ल्याचे सूत्रधार कोण? असा सवाल काँग्रेसचे नेते अधिर रंजन चौधरी यांनी केला आहे. तर पुलवामा हल्ल्याची नव्याने चौकशी करण्याची मागणी काँग्रेस प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी केली आहे.
त्यानंतर भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत, काँग्रेसवर जोरदार हल्ला चढविला. काँग्रेस सातत्याने पाकिस्तानला बळ देत असून, यातून आपल्याच देशाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जात आहे.
विरोधी पक्ष सातत्याने पाकिस्तानचा उघडपणे बचाव करीत आहे. स्वत:च्या आईला गिळंकृत करणारा अजगर आणि काँग्रेस समतुल्य आहे, अशी तुलना त्यांनी केली.