अहमदनगर Live24 टीम, 12 नोव्हेंबर 2020 :- दीपावलीच्या शुभेच्छा देताना सणाचा आनंद जरूर घ्या, पण आरोग्याच्या जबाबदारीचे भान ठेवा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांना केले आहे.
तसेच कोरोनाला सणवार -दिवाळी कळत नाही. लस जेव्हा येईल आणि आपल्यापर्यंत पोहोचेल तोपर्यंत स्वत:ला सुरक्षित ठेवणे आणि घरातले-बाहेरचे यांनाही संसर्ग होऊ न देणे हे आपले प्राधान्य असले पाहिजे असेही ते म्हणाले.
आपण स्वत:देखील केवळ सोशल मीडिया, ईमेलद्वारे शुभेच्छा स्वीकारणार असून भेटीगाठी न करता अतिशय सुरक्षितपणे, घरच्या घरी हा सण साजरा करणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
मुख्यमंत्री म्हणाले, गेल्या सात-आठ महिन्यांत आपण सर्वधर्मीयांचे सण, उत्सव अतिशय सावधपणे आणि नियमांचे पालन करून साजरे केले आहेत.
आपण जो संयम पाळला आहे त्याचाच परिणाम म्हणून आपण या महामारीला इतक्या महिन्यांनंतरही रोखून धरण्यात यशस्वी झालो आहोत हे विसरू नका.
युरोपमधील देशांमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेमुळे गंभीर परिस्थिती निर्माण होते आहे. दिवाळीत आपण बेसावध राहिलो तर पुढच्या काळात आपल्याकडेही रुग्णसंख्या बेसुमार वाढून खूप कठीण आव्हान बनेल असे ते म्हणाले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved