अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये मंगळवारी झालेल्या हिमस्खलनाच्या २ वेगवेगळ्या घटनांत लष्कराच्या ५ जवानांसह १० जणांचा दु:खद मृत्यू झाला. पोलीस व संरक्षण सूत्रांनी ही माहिती दिली.
नियंत्रण रेषेलगतच्या कुपवाडा जिल्ह्यातील माछिल सेक्टरमधील लष्कराच्या एका सीमा चौकीवर मंगळवारी पहाटे बर्फाचा कडा कोसळला. त्यात ४ सैनिकांचा मृत्यू झाला. तर १ जण बेपत्ता झाला. या ठिकाणी एकूण ५ सैनिक बर्फात गाडले गेले होते; पण जवानांनी तातडीने मदतकार्य सुरू केल्याने ४ जणांना बाहेर काढण्यात यश आले.
यातील ३ जणांना मृत घोषित करण्यात आले. तर १ जण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर स्थानिक लष्करी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बेपत्ता जवानाचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे, असे सूत्रांनी सांगितले. नौगाम सेक्टरमध्येही अशाच एका घटनेत ‘बीएसएफ’च्या एका जवानाचा बळी गेला आहे. ही घटना सोमवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास घडली.
या ठिकाणीही युद्धपातळीवर मदतकार्य राबविण्यात येत असल्याची माहिती सीमा सुरक्षा दलाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिली. ‘या भागात ७ सैनिक तैनात होते.
त्यापैकी ६ जणांनाच वाचविण्यात यश आले,’ असे ते म्हणाले. दुसरीकडे, गंदरबल जिल्ह्याच्या गगनगीर भागातील कुलान गावातही मंगळवारी हिमस्खलन होऊन ५ नागरिकांचा बळी गेला.