कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या एका महिला डॉक्टरला निवासी अपार्टमेंट सोसायटीतील काही नागरिकांनी सोसायटीत प्रवेश नाकारल्याची घटना घडली आहे.
ही महिला तिच्या भावास भेटण्यासाठी सोसायटीत गेली होती. ही महिला डॉक्टर हैदराबादमधील कोविड -१९ रुग्णालयात कार्यरत आहे. या लोकांवर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीत महिला डॉक्टरने असा दावा केला आहे की, बुधवारी अपार्टमेंट रेसिडेन्ट असोसिएशनच्या लोकांनी तिच्याशी गैरवर्तन केले आणि अपशब्द वापरले. यानंतर, इमारतीत प्रवेश करण्यास परवानगी नाकारली. ही महिला ऑर्थोपेडिक सर्जन आहेत.
ती त्याच इमारतीत राहणाऱ्या तिच्या भावाला भेटायला आली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्याच्या परिस्थितीचा विचार करता तेथील रहिवाशांनी सोसायटीच्या इमारतीत बाहेरील कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करण्यास मनाई केली आहे, त्यामुळेच तेथे या महिलेस प्रवेश नाकारला.